पान:बलसागर (Balsagar).pdf/110

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चाँद या भूमीवर फडकवू शकू, अशी स्वप्नेही अनेक मुस्लिम नेत्यांनी पाहिली, अजून ती कायमची दृष्टिआड झालेली आहेत अशी शाश्वती देता येत नाही. पुरेशा प्रमाणात मुस्लिम समाजात नवा मध्यमवर्ग निर्माण झाला, त्याने धर्मसुधारणा घडवून आणली, खोमेनी किंवा पाकिस्तानपेक्षा त्यांना येथील राम-कृष्णांची, बुद्ध-महावीरांची आणि शिवाजी-टिळक-गांधींची परंपरा जवळची व आपलीही वाटू लागली, तर अशी शाश्वती आपोआपच निर्माण होईल. पण तोवर मात्र ही परंपरा आपली परंपरा आहे असे मानणाऱ्या हिंदू समाजालाच येथली राष्ट्रवादाची धुरा सांभाळावी लागणार आहे. मग या राष्ट्रवादाला कुणी हिंदू राष्ट्रवाद म्हणेल, कुणी हिंदी म्हणेल वा भारतीय म्हणेल. आशय महत्त्वाचा आहे. डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्यासारख्या नि:स्पृह विचारवंताने हा आशय पूर्वीच सांगून ठेवलेला आहे. धनंजयरावांनी लिहिले आहे- 'आसामी नि गुजराथी, पंजाबी नि तामीळ अशा संघराज्यातील विभिन्न व दूरस्थ लोकसमूहास एकत्र आणण्यास हिंदू परंपरेचा वारसा हेच एकमेव साधन आहे. मोठमोठ्या लोकसंघास सतत संबंध अथवा केवळ शेजार असली कारणे पुरत नाहीत. आपल्या विस्तीर्ण देशातील हजारो वर्षांच्या इतिहासात हिंदुत्वनिष्ठा ती काहीकाळी नि स्थळी जरी लुप्तप्राय झालेली दिसली तरी, एकंदरीत ती फार प्रभावी ठरली असून तिची धारणाशक्ती निर्विवाद आहे. नवीन (भारतीय) संघराज्याने हिंदुत्व नाकारणे म्हणजे गतेतिहासाचा दाखला धिक्कारणे, एवढेच नव्हे तर, भविष्यासही धोक्यात घालण्यासारखे आहे.' (केसरी, २४ ऑक्टोबर १९४७)

 सुज्ञास अधिक लिहिणे न लगे......

 पुण्याच्या सर्व्हंटस् ऑफ इंडिया सोसायटीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय एकात्मता चर्चा सत्रात ( २५, २६ सप्टेंबर १९८२ ) वाचलेला निबंध.

।। बलसागर ।। १०९