Jump to content

पान:बलसागर (Balsagar).pdf/109

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अमेरिका यापैकी कुणाचेच अंधानुकरण केले नाही, म्हणून धडपडत, ठेचकाळत का होईना, चीन पुढे गेला. आपल्यापेक्षा आज तो अधिक स्वाधीन व स्वतंत्र आहे. आपल्यालाही असाच एखादा भारतीय पुरुषार्थाचा मार्ग हुडकावा लागेल. नाही तर आज आहे ती तीन चतुर्थांश भारताची एकात्मताही टिकून रहाणार नाही, तिचा विकास होणे तर लांबच.

 राष्ट्रवाद हे प्रामुख्याने मध्यमवर्गाचे तत्वज्ञान आहे. ज्या समाजात टोकाची विषमता व भेदाभेद असतात, मधली फळी अस्तित्वात नसते, तेथे राष्ट्रवादही कमजोरच असतो. त्यामुळे मागासलेल्या व उपेक्षित समाजघटकांचे लवकरात लवकर मध्यमवर्गीकरण कसे होईल, अगदी वरचा आणि अगदी खालचा तळ यातील अंतर कमी कमी कसे होईल, या दृष्टीने येथील स्वावलंबी नियोजनाची, विकास योजनांची आखणी व्हायला हवी. मागासलेले घटक पुढे आले, त्यांनी शिक्षण घेतले किंवा त्यांना नोकऱ्या वगैरे मिळाल्या की, ते मध्यमवर्गीय होतात म्हणून नाके मुरडण्याची टुम आहे. वास्तविक या प्रक्रियेचे, या वर्गांतराचे किंवा वर्णांतराचे आपण स्वागत करायला हवे. दलितांमध्ये किंवा कामगार शेतमजुरांमध्ये नवा मध्यमवर्ग निर्माण होणे यात वाईट व अस्वाभाविक असे काय आहे ? उलट या प्रक्रियेमुळेच या समाजघटकांचे येथील मातीशी, येथील परंपरेशी खरे जैविक हितसंबंध निर्माण होतील व या हितसंबंधांच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी हे घटकही पुढारलेल्या, पूर्वीच मध्यमवर्गात दाखल झालेल्या घटकांबरोबर उभे राहतील. त्यांना हा देश, हे राष्ट्र आपले वाटेल. 'दलितांना कुठे आहे मातृभूमी ?' असा प्रश्न डॉ. आंबेडकरांनी स्वातंत्र्यसंपादनाच्या वेळी विचारला होता. याचा शब्दशः अर्थ घेण्याचे कारण नाही. त्यामागील आशय असा की, ज्यांचे रक्षण करावे, संवर्धन करावे असे येथल्या मातीशी, परंपरेशी जुळलेले हितसंबंध दलितांमध्ये पुरेशा प्रमाणात निर्माण झालेले नाहीत. स्वातंत्र्यानंतर ते होत आहेत, पण वेग फार कमी आहे. तो वाढवला पाहिजे. मुस्लिम समाजातही मध्यमवर्ग निर्माण न झाल्याने हा समाज आधुनिक राष्ट्रवादापासून दूर राहिला, मुल्लामौलवींचे या समाजावरील वर्चस्व कायम राहिले, त्यांनी अनेक देशांतून राजसत्तेवरही कबजा मिळविला. धर्मभावना आणि मुल्ला-मौलवींचे वर्चस्व या दोन अलग गोष्टी आहेत. टिळक-गांधी धार्मिक होते; पण जुन्या हिंदू धर्ममार्तडांचा त्यांच्यावर प्रभाव नव्हता. अशी फारकत मुस्लिमांमध्ये झाली नाही, म्हणून मुस्लिमांना शेजारच्या हिंदूंपेक्षा दूर वाळवंटातला धर्मबांधव अधिक जवळचा वाटत राहिला, येथील राष्ट्रीय प्रवाहापासून हा समाज अलग राहिला. केवळ अलगच नाही, तर जुने वर्चस्वाचे दिवस पुन्हा येतील, पुन्हा आपण हिरवा

।। बलसागर ।। १०८