पान:बलसागर (Balsagar).pdf/107

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आसामचा प्रश्न हा तेथील मुस्लिम लोकसंख्या वाढल्यामुळे निर्माण झालेला प्रश्न आहे. हा प्रश्न सुटायचा असेल तर तेथील परकीय, म्हणजेच चालू संदर्भात मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण कमी केले पाहिजे किंवा निदान या परकीय शक्तींचा राजकीय दबाव कमी होईल अशी उपाययोजना अंमलात आणली पाहिजे. हीच गोष्ट आसाममधील टेकडी राज्यांची. ही सर्व राज्ये ख्रिश्चन बहुसंख्य असल्याने भारतापासून फुटून अलग निघण्यासाठी उत्सुक आहेत. सैन्यबळाचा वापर करूनच आपण हा सर्व भूभाग भारतात डांबून ठेवत आहोत. काश्मिरबाबतही वस्तुस्थिती वेगळी नाही. तेथले सैन्य काढून घेतले तर राजकीयदृष्ट्या काश्मिर स्वतंत्र राज्य म्हणून लगेच घोषित होईल. शेख अब्दुल्लांचे उद्दिष्ट हे होते व त्यांच्या पक्षाचे ध्येय आजही हेच आहे. कोट्यावधी रुपयांची आर्थिक मदत आपण काश्मिरात ओतली आहे. पण तरीही मुस्लिम बहुसंख्य असल्याने काश्मिरची भारतासंबंधीची बांधिलकी नेहमीच संशयास्पद राहिलेली आहे- राहणारही आहे. तेव्हा, आहे त्या तीन चतुर्थांश भारताची एकात्मता टिकवून धरायची असली, तर या देशातले हिंदूचे प्रमाण कमी होणार नाही हे पाहिले पाहिजे. ऐतिहासिक परिस्थितीमुळे आपल्याकडे आज धर्मांतर हे राष्ट्रांतर ठरत आहे. म्हणून कुठल्याही राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारमंथनातून हिंदू ची या देशातील संख्या कमी करू पाहणाऱ्या धर्मांतर प्रयत्नांचा स्पष्ट निषेध व्हायला हवा. धर्माऐवजी विज्ञानाची कास धरावी हे तत्वतः खरे असले तरी भारताच्या सध्याच्या स्थितीत व मागील अनुभव पाहता, हिंदूधर्मीयांच्या बहुसंख्येचाही आग्रह अटळ आहे, व हा हिंदुत्ववाद नाकारणे म्हणजे शुद्ध आत्मघात आहे. हिंदूची बहुसंख्या हीच येथील राष्ट्रीय एकात्मतेची पहिली व मूलभूत हमी आहे. A bird in hand is worth two in the bushes हे हिंदुत्वविरोधकांनी कधीही विसरू नये.

 अर्थात संख्येपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची असते हेही खरेच. भूतकाळातील थोर परंपरेचा अभिमान आवश्यक असला तरी भविष्यकालीन समान उद्दिष्टे, या उद्दिष्टांच्या दिशेने केलेली वाटचाल राष्ट्राला अधिक बळकटी आणत असते. असे एखादे समान, सर्वव्यापी उद्दिष्ट स्वातंत्र्यानंतर येथील जनतेसमोर ठेवले गेले नाही. नेहरुंचा लोकशाही समाजवाद सर्वांनी पत्करला. पण प्रत्यक्षात लोकशाही म्हणजे निवडणुका व समाजवाद म्हणजे नोकरशाहीची वाढ, असेच दृश्य निर्माण झाले. वास्तविक स्वातंत्र्यानंतर स्वावलंबन हेच देशासमोरील प्रधान उद्दिष्ट ठरायला हवे होते. त्याऐवजी रशियन पद्धतीचे नियोजन आले, प्रगत पाश्चात्य देशांचे भांडवल-तंत्रज्ञान आले. त्यामुळे स्वावलंबनाऐवजी परकीय कर्जाच्या, मदतीच्या चिखलात आज आपण रुतलो आहोत. येथील अफाट श्रमशक्ती, निसर्गसंपत्ती

।। बलसागर ।। १०६