पान:बलसागर (Balsagar).pdf/106

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 

 राष्ट्रीय एकात्मता की राष्ट्रीय पुरुषार्थ !

 

 भारतात पूर्वीपासून भौगोलिक-सांस्कृतिक एकात्मता बऱ्याच प्रमाणात अस्तित्वात होती. पण राजकीय एकात्मता नव्हती. ती इंग्रजी राज्यानंतर आली . पूर्वापार चालत आलेली भौगोलिक - सांस्कृतिक एकात्मता आणि नवी राजकीय एकात्मता यांचा संयोग म्हणजे राष्ट्रीय एकात्मता असे म्हणता येईल.

 हा संयोग दृढ होत गेला याचे कारण स्वातंत्र्यप्राप्तीचे आपले समान उद्दिष्ट. इंग्लंडमध्ये राष्ट्रवादाचा विकास लोकशाहीबरोबरच होत राहिला. राजाविरुद्ध प्रजा असा तेथे सतत संघर्ष होता व राजाविरुद्ध सर्व प्रजेला एकत्र ठेवण्यास राष्ट्रवाद उपयोगी पडला. तसेच साम्राज्यविस्ताराचे एक सर्वव्यापी उद्दिष्टही समाजातील विविध गटांना, परस्परविरोधी हितसंबंधांना एकत्रित बांधून ठेवू शकले. भारतातील राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडली गेली. जातीभेद, प्रांतभेद असले तरी ब्रिटिशांविरूद्ध सर्व देश एक झाला. निदान तीन चतुर्थांश तरी. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर असे सर्वंकष उद्दिष्टच जनतेसमोर नसल्याने आता हा तीन चतुर्थांश देश तरी एकत्र राहतो आहे, की त्याचे आणखी विघटन होणार आहे, अशी काळजी उत्पन्न झाली आहे. एक-चतुर्थांश देश त्यावेळी फुटून का निघाला, भारताची फाळणी का झाली या प्रश्नाचा अभ्यास म्हणूनच आजही आवश्यक आहे. कोणी कितीही निधर्मवाद सांगितला किंवा सर्वधर्मसमभाव बाळगला तरी एक वस्तुस्थिती स्वच्छपणे मान्य केली पाहिजे. जेथे जेथे मुस्लिम किंवा ख्रिश्चन लोकसंख्या वाढली, नेमक्या त्याच भूभागातून वेगळ्या राज्यांची, भारतापासून फुटून निघण्याची चळवळ स्वातंत्र्यानंतर उभी राहिली.

।। बलसागर ।। १०५