पान:बलसागर (Balsagar).pdf/100

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

परस्परानुकूल, परस्पर पोषक व समानतेवर आधारित असतात; पण या समाजात राष्ट्रभावनेचा अभावही दिसतो. असे का ?

 विष्णुशास्त्र्यांचा राष्ट्राभिमान एकारलेला होता, राजा राममोहन रायांसारख्यांच्या, लोकहितवादींच्या, दयानंदांच्या, म. फुल्यांच्या सुधारणावादाला त्यांनी आंधळा व अहंकारी विरोध केला, हा विरोध चूकच होता, असे म्हणता येईल; पण राजा राममोहन रायादिकांना राष्ट्राभिमानाचे आदिरहस्य चिपळूणकरांपेक्षा अधिक जाणवलेले होते हे तर्कतीर्थांचे मत फार विचित्रच आहे. १८५७ च्या बंडात म्हणा, की स्वातंत्र्य युद्धात म्हणा, ब्रिटिशांचा विजय झाला म्हणून चर्चमध्ये जाऊन आकाशातल्या प्रभूचे आभार मानणारे राजा राममोहन रॉय जर राष्ट्रवादाच्या आदिरहस्याचे 'साक्षात्कारी' जाणकार मानायचे, तर झाशीच्या राणीचे पुतळे देशभर उभे करणाऱ्या सगळ्यांना त्याआधी मूर्ख ठरवायला हवे. देशाभिमानाचे आदिरहस्य आदिकवींनीच सांगून ठेवले आहे - जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ।। - स्वत्वाची प्रखर जाणीव. हे स्वत्व जितके व्यापक व विशाल, सर्वस्पर्शी व सर्वसाक्षी असेल तितके चांगले; पण 'स्व'तत्त्वाची जागा, एखादे 'सु'तत्त्व जरी असले, तरी ते घेऊ शकत नाही. सुराज्यापेक्षा स्वराज्य हवे असे टिळक नाही तर का म्हणाले असते ?

 चिपळूणकर इंग्रजशाही विरुद्ध उभे ठाकले. फुले ब्राह्मणशाहीविरुद्ध लढले. आज या दोन्ही शाह्या संपल्या आहेत. घाशीराम कोतवाल नाटकात सुरुवातीस समोर येणारी ब्राह्मणशाहीची भिंत आज बहुतांशी ढासळलेली ढेपाळलेली आहे आणि इंग्रज तर गेलाच; पण तो गेला असला तरी आर्थिक पारतंत्र्य संपलेले नाही. सांकृतिक गुलामगिरी वाढतच आहे सगळ्याच नवस्वतंत्र देशासमोरील हे नवे संकट आहे. इंग्लंडची जागा अमेरिकेने किंवा रशियाने घेतलेली आहे व पूर्वीच्या ब्राह्मणांच्या ऐवजी आता नवे तज्ज्ञ आणि तंत्रज्ञ आले आहेत. पूर्वी 'मंत्र' हस्तगत करून तो नसणाऱ्या इतरांवर गुलामगिरी लादली जायची. मंत्राऐवजी आता 'तंत्र' हे काम करीत आहे. त्या वेळी इंग्रजांचे अंधानुकरण व्हायचे. आता आपली नवी पिढी अमेरिकेकडे डोळे लावून बसलेली आहे. राजकीय स्वातंत्र्य आले; पण आर्थिक व सांकृतिक दास्य वाढले. या नव्या दास्याविरुद्ध, गुलामगिरीविरुद्ध कसे उभे ठाकायचे ? भारतीय राष्ट्रवादासमोरील हे आजचे मुख्य आव्हान आहे. चिपळूणकर - फुले यांच्या प्रवृत्तींचा काहीएक सन्मवय साधूनच ९ आव्हान पेलता येईल. स्वभाषा, स्वदेश याविषयीचा प्रखर अभिमान नसला राष्ट्रवाद उभाच राहू शकत नाही ; पण विषमतेने, जातिभेदाने पोखरलेल्या समाजाचे 'स्वत्त्व' ही बरेचदा पोकळ व नि:सत्व ठरते. समता व स्वातंत्र्य

।। बलसागर ।। ९९