पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रस्तावना

 महिला सक्षमीकरणासाठी काम करणा-या शासकीय अथवा स्वयंसेवी संस्था यांना बचत गट हे एक महत्त्वाचे माध्यम गेल्या काही वर्षांमध्ये गवसले आहे. शहरी अथवा ग्रामीण गरीब महिलांमध्ये काम करताना शासकीय अधिका-यांना अथवा स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांना आर्थिक विषय समजावून सांगण्यासाठी बरीच कसरत करावी लागते, साक्षरतेचे प्रमाण जेथे कमी आहे आणि शिक्षण सोडून बरीच वर्षे जेथे झाली आहेत, तेथे आकडेमोड शिकविण्यासाठी बराच खटाटोप करावा लागतो.
 मात्र असा खटाटोप न करता गटांची संख्या वाढवत गेलो, तर त्यातून नवे प्रश्न तयार होतात. त्यामुळे विविध स्तरांना प्रशिक्षण देणे आवश्यक ठरते, असे प्रशिक्षण कोणाकोणाला दिले पाहिजे, त्यात काय शिकविले पाहिजे, हे लक्षात घेऊन ही त्रिस्तरीय प्रशिक्षण पुस्तिका तयार झाली आहे. ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या दोघी कार्यकत्र्यांनी १२ वर्षांच्या अनुभवान्ती या पुस्तिकेची रचना केली आहे.
 ही प्रशिक्षण पुस्तिका हाताळण्यास सोपी, वापरण्यास सुटसुटीत व बव्हंशी आकडेमोडीची सवय अल्प प्रमाणात असलेल्यांसाठी बेतलेली आहे. बचतगटाच्या सभासद महिला यांचे प्रशिक्षण त्यात पायाभूत आहे.व्यवहार कागदावर मांडावयास शिकताना कोणती आर्थिक शिस्त पाळली तर ते त्यांच्याच फायद्याचे आहे, त्याचे दिग्दर्शन त्यात केले आहे. सध्याच्या गटांच्या संख्यावाढीच्या रेट्यात गटाची भक्कम अस्मिता तयार होण्यासाठी तिचा पाया कसा मजबूत हवा, याचा ऊहापोह या पुस्तिकेत ‘टप्याटप्याने' केला आहे.
 बचत गटाची नुसती सभासद असणं आणि त्यातील अर्थव्यवहारांची जाण असणं यात पुष्कळ फरक पडतो, दरमहा वीस-पंचवीस रूपये बचत करून वीस महिलांचा गट अडीनडीला अनेकांच्या उपयोगी कसा काय पडू शकतो, याचे रहस्य गटात पैसा कसा खेळतो या पाठातून उलगडून दाखविले आहे. व्याजदराचा उलगडा, गटाचे विविध नियम, कोणते निर्णय योग्य व ते का याची जाण चर्चात्मक पद्धतीने जोपासण्यासाठी छोट्या छोट्या ५ पाठांची मांडणी केली आहे.
 त्या त्या गटाची प्रमुख महिला ही या उपक्रमाच्या पाठीचा कणा आहे. प्रमुखाला नेतृत्वगुण असणे महत्त्वाचे, सचोटी अत्यंत आवश्यक, त्यामानाने शिक्षण, लिखापढीची सवय असणे-नसणे हे दुय्यम आहे, याची जाणीव व्यवहारात अनेक महिलांना होत असेल. गटप्रमुखांसाठी असलेले ७ पाठ त्यांची गटाच्या व्यवहारावरची पकड मजबूत करणारे आहेत. सोप्या उदाहरणांवरून अवघड आकडेमोडीकडे क्रमाक्रमाने गेल्यामुळे आत्मविश्वास वाढत जातो, असे निदर्शनास येईल. अनेक प्रसंगांना तोंड देताना नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे, याबाबत गटप्रमुखांची वृत्तीघडण होण्यास या पाठांचा उपयोग होईल. प्रशिक्षण देणारीने गटप्रमुखांच्या विषय समजण्याच्या वेगाने हळूहळू पुढे गेले पाहिजे. नुसत्या तयार सूचना देण्याचे यात टाळले आहे. काही करून बघितले, मांडून बघितले की त्या विषयाचे मर्म पक्के लक्षात येण्यास मदत होते,
 गटाचे व्यवस्थापन घडवून आणणा-या कोणत्याही संस्थेच्या संघटिका म्हणजे तिसरा स्तर होय. त्यांना खूप व्यवधाने सांभाळावी लागतात. नेमकी माहिती असावी लागते. समोर आलेली कागदपत्रे अचूक आहेत का, याचा कमी वेळात अंदाज घ्यावा लागतो, म्हणून त्यांचे प्रशिक्षण यात आवर्जून योजले आहे. त्यांच्या पाठांची रचना करताना पत्रकांची मांडणी तपासता येणे, चुकांच्या संभाव्य जागा हेरता येणे, बँक व्यवहारांबाबत गटप्रमुखांना मार्गदर्शन करता येणे अशा गरजा लक्षात घेऊन मजकूर घातला आहे.
 प्रशिक्षणाचे तंत्र म्हणून काही गणिते जशी विविध पातळ्यांना सोडवावयास सांगितलेली आहेत, तशा दोन स्पर्धा सुद्धा घेण्यास सुचविले आहे. त्यामुळे प्रशिक्षणातील रंजकता वाढेल व भीड चेपण्यास मदत होईल.
 पुस्तिकेत शेवटी दिलेल्या प्रातिनिधिक अनुभवांवरून नव्या गटांना चुकांची पुनरावृत्ती टाळता येईल. संस्थांचे कार्यकर्ते यात अनेक प्रकारची भर घालू शकतील
 बचत गटांच्या प्रशिक्षणाबाबत अनेक ठिकाणी विविध प्रकारचे साहित्य प्रकाशित झाले आहे. या पुस्तिकेमुळे केवळ आणखी एका संख्येची भर पडावी, असा उद्देश नाही. हिचा वापर करून आपापल्या अनुभवांची देवाणघेवाण करता यावी, प्रशिक्षणाच्या नेमक्या गरजा स्पष्ट होत जाऊन त्यानुसार आणखी साहित्य तयार होत राहावे, अशी कल्पना आहे.
 हा शैक्षणिक हेतू मनात असल्यामुळे नाबार्डने या पुस्तिकेसाठी महत्त्वपूर्ण आर्थिक साहाय्य दिले, त्याबद्दल त्यांचे अधिकारी श्री. डेरे व त्यांचे सर्व सहकारी यांचे आभार मानतो व प्रशिक्षकांच्या हाती ही पुस्तिका सोपवितो.

श्री. वि. शं./ सुभाष देशपांडे

कार्यवाह

ज्ञान प्रबोधिनी, पुणे