पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रशिक्षकासाठी टिपण -सभासद प्रशिक्षण ४

बरोबर विधाने ओळखा

१) बचत गट म्हणजे पैशाच्या उलाढाली. हे विधान चूक आहे कारण फक्त पैशाच्याच उलाढाली म्हणजे बचत गट नाहीत.
२) गट प्रमुखांनी बचत गटाची सारी कामे करायची. हे विधान चूक आहे कारण ही जबाबदारी फक्त गट प्रमुखांचीच नाही.
३) कर्ज मिळावे म्हणून गटाचे सभासद व्हावे. हे विधान चूक आहे कारण सभासद झाले की कर्ज मिळते. महत्त्व सभासद होण्यास आहे. कर्ज महत्त्वाचं झालं तर कर्ज मिळेपर्यंतच गट चालेल.
४) ✓ ही निरंतर शिक्षणाची संधी आहे.
५) x वाटप प्रमुखांनी करावे एवढे बरोबर, पण ठरवावे मात्र सर्वांनी.
६) x प्रमुखांना कुठल्याही नियमात सवलत नाही. गटप्रमुख म्हणून सवलती घेणारीला प्रमुख करू नये.
७) x पैसे गोळा होणे हा गटाचा एक भाग आहे. महिला गोळा झाल्या पाहिजेत, तर तो गट सर्वांचा.
८) ✓ एकत्र येण्यानेच खूप कामे होतात.
९) ✓ त्यासाठी सर्वांनी पूर्णवेळ हजर राहणे गरजेचे आहे.
१०) x नाही, गट म्हणजे गावकीचा फंड नाही, गटाने दरवर्षी हवेतर व्याज वाटून घ्यावे.
११) x महिलांना गट ही शिक्षणाची संधी आहे. चुका करून दुरुस्त करायचीसुध्दा संधी आहे. लक्षात ठेवायला हवे की पुरुषांची अगदीच गरज पडली तर मदत घ्यावी, पण महिलांना येत नाही म्हणून नव्हे!
१२) x गटाचे हिशोब सोपे असतात. गटात जाऊन पैशाचे व्यवहार कळायला लागतात.
१३) x कमीत कमी ५ व जास्तीत जास्त २० महिलांचा/पुरुषांचा किंवा मिश्र गट होतो. २० पेक्षा जास्त मोठा गट झाल्यास त्याची नोंदणी करणे आवश्यक असते.
१४)✓ प्रत्येक जण गटाची मालकीण आहे. गटात होणाऱ्या सर्व गोष्टींना ती जबाबदार, त्यामुळे उपस्थिती महत्त्वाची.
१५) x गट महिलांच्या स्वयंपूर्णतेसाठी करायचे. त्याला सरकारच्या योजनांचा लाभही मिळतो. जो गट योजनेसाठी होतो, तो योजनेपुरताच टिकतो.
१६) x नाही. अडाणी महिलांना अडाणी ठेवण्यातच सावकाराचा कावा आहे. गट त्यांना शहाणे करण्यासाठी दार उघडेल.
१७) ✓ नातेवाईकांशिवाय एकत्र येण्याची एरवी संधी मिळत नाही.
१८) ✓ अर्थात संधी घेतली तर !
१९) ✓ बायजाबाई शिकलेल्या नसल्या तर गटातील बाकीच्या खाते प्रमुख शिकलेल्या असाव्यात. बायजाबाईने लिहिण्यापेक्षा इतर गोष्टींवर लक्ष ठेवणे, पैसे मोजणे अशी कामे करावीत.
२०) x फक्त प्रमुखांपैकी एकीने अथवा जिला कर्ज हवे तिने जाऊनही बँकेचे काम होते. गटाची योग्य ती कागदपत्रे सोबत हवीत.

★★★★★
१६