पान:बचतगटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिका (Bachatgatasathi Karyaksham Vyavsthapan Prashikshan Pustika).pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रशिक्षकासाठी टिपण - सभासद प्रशिक्षण ३

योग्य पर्याय निवडा

 गट सुरू होताना गुण्या-गोविंदाने सुरू होतो, पण जसजसा काळ लोटतो तसतशा गटात कुरुबुरी सुरू होतात. त्याचा अभ्यास केल्यावर समजलं की, अपवादानं चालेल असं गटानं जेव्हा म्हटलेलं असतं तेच नियम व्हायला लागतात. त्यामुळे सोबतच्या प्रशिक्षणात कुठलं ठराविक उत्तर बरोबर किवा चूक असं काही नाही, पण ह्यावर गटात मोकळेपणानं चर्चा व्हायला हवी.
१) एखाद्या ठिकाणी महिला 'गटप्रमुख' आहे या गोष्टीचे भांडवल करून ती सवलत घेतली आहे असेही घडू शकते. तर कधी जबाबदार व्यक्तीही गरजेच्या कारणासाठी सवलत मागते. याचा विचार करून सर्वांनी निर्णय घ्यावा. प्रमुखाकडून गटाच्या अपेक्षा काय, यावर चर्चा व्हावी. चर्चेचे मुद्दे - गट प्रमुख कोणास करावे? तिचे शिक्षण, वय, अनुभव, सामाजिक स्थान, गटासाठी वेळ देण्याची तयारी, मोबदल्याची अपेक्षा यावर चर्चा व्हावी. सभासदांचे व प्रमुखाचे अधिकार काय? याचीही माहिती या निमित्ताने जाता जाता द्यावी.
२), गटातल्या महिलांनी समजून घ्यावे असे नेहमी म्हटले जाते. कुठल्या अडचणी खरंच अडचणी असतात, कधी परवानगी काढून हजर नसलं तरी चालेल? तेव्हा पैसे पाठवून द्यायचे का? यावर चर्चा व्हावी. या निमित्ताने सभासदाच्या जबाबदाऱ्या सांगाव्यात व गटात हजर असली तरी किंवा नसली तरी प्रत्येक सभासद ही सर्व निर्णयांना जबाबदार असते, हे उदाहरणाने सभासदांना सांगावे.
३) गट सर्व सभासदांचा असतो हे सर्वांना समजून सांगावे. अर्थसाहाय्य कर्ज कधीही न घेणाऱ्या व्यक्तीला व्याजाचा सर्वाधिक फायदा होणार म्हणून व्याजदर जास्त असावा असे ती व्यक्ती म्हणत नाही ना? यावर चर्चा व्हावी. गटात निर्णय एक - दोघींचा असावा का गटाचा? थोडक्यात काय, तर जास्तीत जास्त सभासदांचा फायदा व्हावा. यावर चर्चा व्हावी व चर्चेनंतर जास्ती जणींना जे वाटते तो निर्णय असे ठासून सांगावे. बोलणारीची जात, तिचं गावातलं वजन हे सारं गटाबाहेर. गटात सर्वजणी सारख्या! हे पुन्हा पुन्हा सांगावे.
उदा: गटात येणाऱ्या धनगराच्या बाईला कर्जासाठी २ जामीन लागतात तसेच पाटलाच्या बायकोलाही लागतात कारण 'गटात त्या दोघी सारख्या.
४)] गट झाल्यावर थोड्या शिल्लक पैशाचेही काय करायचे याची गटाला कल्पना हवी. नाहीतर हिशोब करताना हे प्रत्येक महिन्याचे थोडे थोडे पैसे करत खूप होतात आणि वार्षिक हिशोबात ते सापडत नाहीत. या विधानाच्या उत्तराच्या पर्यायांमधील तिसऱ्या पर्यायामध्ये लिहिल्याप्रमाणे हे पैसे इतरांच्या नावावर मात्र चुकूनही लिहिले जाऊ नयेत. याची सभासदांनी खात्री करावी. शिलकीचा निर्णय न झाल्याने कर्ज म्हणूनही घेऊ नये.
५)गावात गट सुरू असतात, पण त्याकडं काहीजणी मुद्दाम दुर्लक्ष करतात. त्यांच्यावर वेळ आली की गरजेपोटी गटाकडे येतात, त्यामुळे कुठली गरज महत्त्वाची? आजारपणाची, लग्नाची की व्यवसायाची? यावरही इथे चर्चा घ्यावी व त्यासोबत कोणाची गरज महत्त्वाची? गटाची? गटातल्या सभासदांची? की श्यामची? गावाचं गटाशी नातं काय? याचीही चर्चा व्हावी. गटाबाहेर पैसे देऊ नयेत. गट फक्त पैशापुरताच नाही, हे इथं ठासून पुन्हा पुन्हा सांगावे.

*****