पान:बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी (Banket Paul Takanyapurvi).pdf/९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोणी पण ओळखेल तुम्हाला बँकेत.... म्हणून नेहेमी दिसता तसा दिसणारा फोटो बँक मागते. त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तुमची सही! त्यावरून बँकेचा साहेब तुम्हाला ओळखतो..... कधी कधी जर साहेबाला प्रश्न पडला तर तो कॉम्प्युटर वर तुमची सही मोठी करून सुद्धा बघतो मगच पैसे देतो.'
 तिच्या बापानं दारुड्या नवर्याशी लगीन लाऊन दिलं तसं 'आपले भोग' असं वाटून ती निमुटपणे सारं सहन करत होती. अडीनडीला दुस-याच्या शेतावर काम करून पैसे आणत होती...तरी तिनं कमावलेले ते पैसे मार बसला कि दारूला देत होती.
 आज तिचं मन शांत झालं. तिनं राधाला चहाला घरी नेलं, पटकन चहा केला. चहा देतादेता हळूच म्हणाली, 'त्यांना मान्य नाही हे काही. तरी तुझ्यामुळे धाडस केलं बघ!' राधाच्या नजरेनच तिला सारं समजलं अस सांगितलं....
 थोडे चहाचे गरम गरम घोट पोटात गेल्यावर भीमा म्हणाली, 'सगळे पैसे नाही भरले. थोडे ठेवलेत लपवून.... माझी सीता माहेराला येईल तेव्हा खर्चायला होतील.' राधाने ‘कधी येणार?' विचारले तर भीमाने सहा महिन्या नंतर असे सांगितले. राधा म्हणाली, 'मग तेव्हा आणले असते कि काढून... आता तर ठेवायचे बँकेत.' त्यावर भीमा म्हणाली, “तसं व्हाई ह्यांना हे काही मान्य न्हाई. गेले बँकेत नि आणले माझे पैसे काढून तर मलातर कळणार पण व्हाई.... म्हणून म्हंटले आपले राह देत माझ्यापाशी थोडे.....' 'म्हणजे?' राधाने न समजून विचारले पुन्हा पुन्हा विचारल्यावर तिला समजलं की भीमाबाईला वाटतंय की तिचा नवरा तिच्या खात्यातून भिमाच्या न कळत पैसे काढून आणेल. मग राधाने सांगितले, 'अस होणार नाही कारण खातं तुझं एकटीचं आहे.'.... पण भिमा आपलं म्हणत होती 'अग राधा खात्यावर माझं नाव आहे ना ....मग कळणारच की बँकेला कि ते माझे मालक आहेत म्हणून!..... ‘त्यावर राधा सांगत होती की ‘तरीही तुझ्या सही शिवाय त्यांना तुझ्या खात्यातले पैसे मिळणार नाहीत' हे भीमाला समजूच शकत नव्हते. 'अगं अन वेळेला मीच पाठवलं त्यांना पैसे काढून आणायला तर?.... बँक माझे पैसे त्यांच्याकडे देणार न्हाई होय?'.... भिमात्याचा परत प्रश्न होताच, ‘हो हो ....अस झालं तर तुला सही केलेला चेक द्यावा लागेल त्यांच्या सोबत... तरच तुझ्या खात्यातले पैसे त्यांना मिळतील ....जसे ते त्यांना मिळतील तसे ते कोणाला पण मिळतील. तू ज्याचे नाव चेक वर लिहिशील त्याला मिळतील....