पान:बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी (Banket Paul Takanyapurvi).pdf/७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
फोटो माझ्या ओळखीसाठी
अनुभव १

 बँकेत खाते काढायचे होते. कुसगावच्या भागिरथीबाईंना खाते काढण्यासाठी फोटो हवा असे सांगितले. संस्थेच्या कार्यालयात त्या आल्या तेव्हा त्यांनी सोबत फोटो आणला होता. ताईनी विचारले, “भागिरथीबाई, पाहू फोटो." तर त्यांनी त्यांचा भरपूर दागिने घातलेला उभ्याचा असा पूर्ण फोटो हातात ठेवला. फोटो पाहून ताई म्हणाल्या, “आता एवढा मोठा फोटो का हो काढून घेतलात?" असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, “ताई, एवढी वर्षं झाली, कधी माझा फोटोच कोणी काढला नव्हता. लग्नात सुदिक तवा फोटो काढत नव्हते. म्हंटलं आता आली आहे संधी तर चांगले दागिने घालून पूर्ण फोटोच काढून घेतला! नाहीतरी माझ्या मेलीची हौस कधी भागणार ?".
 बँकेत लागणारा फोटो हा बँकेत आपली ओळख पटविण्यासाठीचे उपयुक्त कागदपत्र म्हणून काढायचा असतो. तो अर्धा असतो. हा फोटो खातेदाराचा चेहरा स्पष्ट दिसणारा व दोन्ही कान दिसणारा असा समोरून काढलेला हवा. त्याचा आकार ३.५से.मी x ४.५ से.मी. असावा.

पासबुकात नोंद होईपर्यंत स्लिप जपून ठेवावी.
अनुभव २

 झेप महिला बचत गटाची प्रमुख असणाऱ्या नंदाने बँकेत पैसे भरले, पण ती बँकेतून बाहेरच पडायला तयार नव्हती. ती मॅनेजरना म्हणाली, "तुम्हाला पैसे मिळाले असं लिहून द्या की माझ्या वहीत." मॅनेजर म्हणाले, "असं काय सगळ्यांच्या वहीत लिहीत बसू का काय? म्हणून तर ती पावती शिक्का मारून दिली आहे. ती जपून ठेवायची. पासबुकात नोंद झाली की मग टाकून द्यायला हरकत नाही. रोख पैसे असले तर अर्ध्या तासात नोंद होते, पण धनादेश / चेक भरला असला तर मात्र तो वठल्यानंतर पासबुकात नोंद दिसते. कधी कधी चेक वठायला आठ-पंधरा दिवस सुद्धा लागतात."
 हे ऐकल्यावर मात्र नंदाने शिक्का मारलेला स्लिपचा भाग पावती म्हणून वहीत जपून ठेवला. आता तिच्याकडे बँकेत पैसे भरल्याचा पुरावा होता.