पान:बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी (Banket Paul Takanyapurvi).pdf/३६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रिझर्व बँकेच्या पंच्याहत्तरी निमित्त भारतभर आर्थिक समावेशनाचे काम झाले. या योजनेतील एकमेव १००% यशस्वी गाव म्हणजे भोर तालुक्यातील खोपी! ज्ञान प्रबोधिनीच्या सहकार्याने आणि बचत गटातील महिलांच्या पुढाकाराने झाले. या गावात धडपडून काम केलेल्या कावेरीताई शिवरकर यांना तत्कालिन गव्हर्नर डॉ. सुब्बाराव यांनी भेटायला बोलावले तेंव्हा.

आधुनिक काळात दैनंदिन जीवनातही अनेक परिमाणे बदलत चाललेली आहेत. पूर्वीपासून संपूर्ण आर्थिक क्षेत्रात बँकांचे मोलाचे आणि महत्त्वाचे स्थान असले तरी आता बँकांच्या कार्यप्रणालीत अमुलाग्र बदल झाला आहे. राष्ट्रीयकरणानंतर ग्रामीण क्षेत्रात बँकांचे जाळे विस्तृत प्रमाणात पसरले, तेथेही स्वाभाविकपणे हा बदल दृष्टोत्पतीस येतो. सांप्रत या संबंधातील महिलांचे योगदानही लक्षणीय ठरले आहे. आर्थिक साक्षरतेच्या प्रसारामुळे व प्रशिक्षणामुळे ग्रामीण महिला उद्योगशील बनल्या आहेत. त्यांचे तसे होणे ही काळाचीही गरज आहे. लघुउद्योग, बचत गट, अनुषंगिक इतर कामे यामुळे महिलांचे हाती आता पैसा खेळू लागला आहे. शिवाय कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना, तेथील आर्थिक व्यवहारातही महिला जागरूकतेने लक्ष घालू लागल्या आहेत. आता महिलांचा बँकेशी संबंध येणे गरजेचे, आवश्यक व अपरिहार्य ठरले आहे. परंतु कित्येक वेळा असे आढळून येते की, महिलांना बँकेच्या कामाची, त्यांच्या कार्यप्रणालीची, संबंधित सोयी सुविधांची पूर्ण माहिती नसते. त्याबाबतची तोंडओळख झाल्यास त्यांना बँकेत जाऊन सहजतेने व्यवहार करणे सोयीचे होईल या उद्देशाने स्त्री शक्ती प्रबोधन-ग्रामीणच्यावतीने 'बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी' हे प्रस्तुतचे पुस्तक अनुभवी व कुशल मान्यवरांकडून तयार करून घेण्यात आले आहे. मला नमूद करताना आनंद वाटतो की, आमच्या रोटरी क्लब पुणे साऊथच्या योगदानातून हे पुस्तक आकाराला आले आहे. मला विश्वास वाटतो की ग्रामीण महिलांनी या पुस्तकाचा बारकाईने धांडोळा घेतल्यास त्यांना बँकाविषयीचे काम करणे अधिक सुकर होईल.

रो. मोहन पटवर्धन

अध्यक्ष, २०१८-१९

रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ