प्रशिक्षण ९
चला 'ट्रिपला' बँकेत जाऊ !
प्रशिक्षकाने प्रत्येक बचत गटातील ५ सभासद महिला, ज्यांना
व्यवहाराची जाण आहे अशा, एकूण २0-२५ जणींना एकत्र करून बँकेत
दुपारी १.३० ते २.00 च्या सुमारास घेऊन जावे. ( साधारणपणे तुमच्या
बँकेतील कर्मचा-यांची जेवणाची वेळ झाल्यावर बँकेत जावे. ) बँकेत लोक
रांगेत उभे राहून काय-काय व्यवहार करतात ते बघायला सांगावे. कॅश
देणे-घेणे संपल्यावर बँक व्यवस्थापकांना बँकेबद्दल माहिती सांगायला सांगावी.
या सहलीचा अधिक उपयोग होण्यासाठी
- पासबुक भरणे, वेगवेगळ्या रंगाच्या स्लीप भरणे ही कामे करायला लोक
येतात हे चर्चेत येईल असे पाहावे.
- काचेच्या खोलीतील किंवा जाळी लावून तयार केलेल्या खोलीतील
(केबीन) माणूसच फक्त पैसे देवाण-घेवाण करतो, हे सर्व जणांच्या लक्षात
येते ना ते पाहावे.
- एकाच आडनावाचे खूप लोक असल्यामुळे बँकेतील स्वतःची ओळख
म्हणजे आपला खाते क्रमांक असतो, हे सुद्धा आवर्जून सांगावे.
- पैसे काढायला जाताना पासबुक गरजेचे आहे हे निरीक्षणातून सांगावे.
बँकेत पैसे भरणे म्हणजे ती कर्जाची परतफेडच असते असे नाही, तर
बचतसुद्धा असते हे सांगावे.
- बँकेत व्यवहारासाठी एखादी अनुभवी ग्राहक महिला आली असेल तर
तिला व्यवहार करताना भिती वाटते का? असे जरूर विचारावे व तिचे बँकेचे
अनुभव सर्वांपर्यंत पोहोचतील असे बघावे.
- अशी बँकेत ट्रिप काढल्याने ग्रामीण महिलांच्या मनावरचे दडपण दूर
होते व आपल्यालाही हे जमेल असे वाटते. त्यामुळे बँक व्यवहार जास्त
जागरूकपणे केले जातात.