Jump to content

पान:बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी (Banket Paul Takanyapurvi).pdf/१४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तेव्हापासनं तिला एकदा गटाची बैठक बघायला जायचं होत. शेवटी तिनं गटाची सकाळची वेळ गाठलीच! गावातल्या सा-या बायाबायाच पैशाची सारी कामं करत व्हत्या. “कोण करतंय हिशेब?" तिने विचारले. सुरेखाकडे साऱ्यांनी बघितलं. तिला वाटलं सुरेखाचे मालक! ती जरा बघते तो काय सुरेखाच पुढे होऊन सगळा हिशेब बघत होती. पैसे घेणं, व्याजाचा हिशेब करणं, कर्ज देणं, सारं चोख! जिच्या तिच्या पुस्तकात लिहून पण देत होती. तान्हु म्हणाली, "अगं बायांनु, किती गं फुढं गेलात? आम्हाला संगती न्हाई व्हय घेणार?"
 “या की! आम्ही काय मुरळी पाठवून बोलवायचं का काय तुम्हाला? सुरेखा म्हणाली. एकीकडे गटाची बैठक संपवून ती तान्हुबाईला पुढे म्हणाली, "चलाच आता माझ्या संग. मी हे गटाचे पैसे भरायला बँकेत चालली आहे." तान्हु तशी सवड घेऊनच सकाळचीच बाहेर पडली होती. सुरेखा संग ती बँकेत गेली.
 सुरेखाने गटाचा शिक्का बँकेतून घेतलेल्या स्लिपवर मारला, खाते नंबर लिहीला, बँकेत भरायचे पैसे कितीच्या किती नोटा आहेत सारं लिहिलं, नि खिडकीत दिलं. बँकेतल्या माणसांनी शिक्का मारून कागद फाडला नि पुन्हा सुरेखाच्या हातात दिला. सारं पाहून तान्हु म्हणाली, “अगं त्यानं तुझे पैसे सा-या पैशात मिसळले कि गं! आता? तुझे किती कसं कळायच?" सुरेखानं शिक्का मारलेला कागद काढून दाखवला. “यावर लिहीलय बघ बँकेला पैसे मिळाले. म्हणजे मी पुढच्या वेळी पैसे काढायला परत आले की दुसरी स्लिप भरून देणार. मग ते मला त्यावर लिहीलेली रक्कम देतील पण त्यावेळी बँकेकडे असलेल्या नोटा मधून पैसे देतील. आपल्या ह्याच नोटा देणार नाहित बँक काही सावकाराने ठेवलेल्या दागिन्यासारख्या आपल्याच नोटा जपून त्याच मला परत देणार नाही." बँक हे पैसे वापरते म्हणून तर आपल्याला बचत खात्यावर व्याज मिळते ना!
 तान्हु तोवर बँकेत इकडे-तिकडे बघत होती. पाठीमागे ठेवलेल्या मुख्य खुर्चीवर बसलेल्या बाईकडे बघून तान्हू म्हणाली, “ही बया इथं बसून काय करतीय?", सुरेखा म्हणाली, “जरा हळू बोल, ती बया म्हणजे या बँकेची शाखा व्यवस्थापक म्हणजेच बँक मॅनेजर आहे. तीच आपल्या गावाची सारी कामं इथं बसून करते."
 सुरेखा सोबत तान्हु घरी परत आली खरी पण बचत गट करून बँकेत खातं काढायचं हे ठरवूनच. गावातल्या बायांचं शहाणपण ह्या बँकेच्या व्यवहारातनं किती वाढलंय हे तिला चांगलंच लक्षात आले होते!