पान:प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf/9

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


त्यांच्या असामान्य धडपडीचं अप्रूप वाटलं. त्या वेळी ‘महाराष्ट्र मानस नावाचं हिंदी पाक्षिक महाराष्ट्र शासन प्रकाशित करायच. यशवंतराव चव्हाण निधन १९८४ ला झाल्यानंतर आलेल्या पहिल्या जयंतीला (१२ मार्च, १९८५) 'लोकराज्य' व 'महाराष्ट्र मानस' पाक्षिकांचे 'यशवंतराव चव्हाण विशेषांक' प्रकाशित झाले होते. त्यात मी कृष्णाकाठची समीक्षा नि त्यांच्या निवडक भाषणांचे अनुवाद केले होते व ते त्यात प्रकाशितही झाले होते. तेव्हापासून मी वेळोवेळी त्यांना जाणून घेत आलो आहे.
 मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसे यशवंतराव चव्हाण यांच्या मोठेपणाची चुणूक शाळेतूनच दिसून आली. देवराष्ट्रे या त्यांच्या जन्मगावी ते शाळेत शिकत असताना 'तू पुढे कोण होणार?' असं गुरुजींनी विचारल्यावर ‘मी यशवंतराव चव्हाण होणार' म्हणणारा हा माणूस उपजतच स्वयंभू, स्वप्रज्ञ होता. गुणदोषांसह तो स्वतःचं चित्र, चारित्र्य नि चरित्र घेऊन जन्मला होता. लहानपणी वडील वारले. मोठ्या भावानं त्यांचं शिक्षण केलं. घरी सत्यशोधक चळवळीचं वातावरण होतं. राष्ट्रीय आंदोलनाचा काळ होता तो. वयाच्या १५-१५ व्या वर्षी जो मुलगा राष्ट्रीय चळवळीत भाग घेतला म्हणून तुरुंगात जातो, ते केवळ बाह्य प्रभावांनी नाही. त्यांच्यात उपजतच राष्ट्रभक्ती होती. हायस्कूलला ते क-हाडच्या टिळक हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्या शाळेचं ब्रीद वाक्य होतं- ‘सर्व हि तपसा साध्यम'... तपस्येनं सर्वकाही साध्य होतं. या वाक्याचा त्यांच्या जीवनावर असाधारण प्रभाव पडल्याचं दिसतं. त्यांनी 'लोकनेता' म्हणून मिळविलेलं बिरुद कुणाच्या पूर्व पुण्याईनं आलं नव्हतं. कष्टसाध्य, प्रयत्नसाध्य, संघर्षसाध्य असं त्यांचं यश होतं.
 मॅट्रीक होऊन ते पदवी शिक्षणासाठी म्हणून कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात आले. बिंदु चौकातील भुसारी वाड्यात त्या वेळी ते राहात. करवीर नगर वाचन मंदिरात नित्यनियमाने वाचन करीत. 'यशवंत', 'वैनतेय इ. नियतकालिकांचे नियमित वाचन करीत. याच काळात त्यांनी वि. स. खांडेकरांच्या दोन ध्रुव', 'पांढरे डाग' सारख्या कादंब-या वाचल्या नि त्यांचे मन समाजवादी झालं. आयुष्यभर त्यांनी वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, शिवाजी सावंत, आनंद यादव, रणजित देसाई इ. कोल्हापूरच्या साहित्यिकांचं लेखन ऋणानुबंध म्हणून वाचलं. ना. सी. फडके तर त्यांचे प्राध्यापकच! यशवंतराव चव्हाण यांची जयंती भाषणं ऐकली असतील त्यांना त्यांच्या भाषणावर असलेलं फडके-खांडेकर प्रभाव लगेच लक्षात