पान:प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असलेल्या एका वर्गास दुसरा एकांत कैदी वर्ग जोडण्याचे बाबांचे कार्य अजोड म्हणावे लागेल.
 बाबांनी १९५७ साली नागपूरजवळ १२० एकर शेती घेतली. त्यातून अशोकवन उभारले. १९६२ साली त्यांना आनंद निकेतन महाविद्यालय अशासाठी सुरू केलं की परिसरातील विद्यार्थ्यांना वर्धा, नागपूर, अमरावतीकडे धाव घ्यायला लागायची. हाताची बोटं झडलेल्यांनी धडधाकट विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाची इमारत उभी केली. आज २000 विद्यार्थी तिथं शिक्षण घेत आहेत. कला, वाणिज्य, कृषी अशा अनेक विद्याशाखा कार्यरत आहेत. १९६६ साली त्यांनी संधीनिकेतन उभारले. अंध, अपंग, मतिमंद, मूक, बधिर, अपघातग्रस्त, पोलिओग्रस्त अशा विकलांगांना पुनर्वसनाचे साधन म्हणून अनेक उद्योग प्रशिक्षण व उत्पादनाची संधी दिली व ते स्वावलंबी झाले.
 बाबा आमटेंचं कार्य जितकं प्रेरक तितकंच त्यांचे साहित्यही. विशेषतः ‘ज्वाला आणि फुले'सारखा त्यांचा काव्यसंग्रह म्हणजे कृतिशील माणसांना त्यांनी दिलेलं एक बौद्धिक होकायंत्रच. ज्यांना कुणाला आपला सद्सद्विवेक सदैव सजग ठेवायचा असेल त्यांना ‘ज्वाला नि फुले' रामबाण उपाय होय. ज्यांच्या पावलांखालील काट्यांची फुलं झाली त्या ‘भारत जोडो' यात्रेमागे बाबांचं तत्त्वज्ञान होतं.

 हाती घेतलं ते तडीस नेण्याच्या निर्धारानं बाबांनी एकामागून एक उपक्रम, प्रकल्प उभारले नि ते यशस्वी करून दाखवले. मातीचं सोनं करण्याची किमया त्यांनी वरोरा, सोमनाथ, मूल, हेमलकसा, भ्रमरागड परिसरात करून दाखवली ती मातीच्या नात्यातून. श्रमिकांचं राज्य या मार्क्सच्या कल्पनेतून अवतरलेली प्रत्यक्ष सृष्टी म्हणजे 'श्रमिक विद्यापीठ' होय. 'ज्याने कु-हाडीने लाकडे फोडून आपल्या हातावर घट्टे उठवले आहेत त्यालाच त्या लाकूडतोड्याच्या हातावर उठून फुटलेल्या फोडांच्या वेदना कळतील,' असं त्याचं असलेलं म्हणणं चिंतनीय खरं! अन्न हेच आजचं उपनिषद मानणारे बाबा एकविसाव्या शतकात दारिद्र्याचा महासागर आटवायला निघालेले आधुनिक अगस्ती होते!

प्रेरक चरित्रे/२६