पान:प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बाजारात गेलेले बाबा. त्यांना एक भिकारी भेटतो. बाबांकडे भिक मागतो. बाबा आपल्या खिशातील सारा खुर्दा त्याच्या वाडग्यात टाकतात. भिका-याच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. अश्रूत त्यांना इंद्रधनुष्य दिसतं. मग रोज इंद्रधनुष्य निर्मिण्याचा बाबांना ध्यासच लागून राहतो.
 सामान्य माणसं मोठी होतात, ती सामान्य प्रसंगात असामान्य धैर्य दाखवितात म्हूणन. बाबा शिक्षणाने वकील झालेले. वकिली केली असती तर वडिलांची श्रीमंती शतपट करू शकले असते. पण शहराकडून खेड्याकडे परतणारा हा कार्यकर्ता. त्यांच्यापुढे महात्मा गांधींचा आदर्श होता. महात्मा गांधींनी केलेली कुष्ठरोगी परचुरे शास्त्रींची रुग्णसेवा ते ऐकून होते. अन् जीवनात असा रोगी भेटल्यावर ते प्रथमक्षणी भेदरले. नंतर भिडले ते कायमचे. त्यातून 'आनंदवन' उभारलं. या साच्यामागं ही एक जीवनदृष्टी होती. कुरूप जग सुंदर करण्याचा ध्यास होता. ‘दान माणसाला नादान करतं' हे विनोबांचं वाक्य त्यांच्या कानी-कपाळी घोंघावत होतं. मग त्यांनी कुष्ठरोगी फक्त बरे होऊन चालणार नाही तर ते स्वावलंबी, मिळविते झाले पाहिजेत म्हणून बाबांनी ‘श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठ’, ‘श्रमआश्रम’, ‘साम्यकुल असे अनेक प्रयोग केले. सार्वजनिक शेतीचा प्रयोग केला. मार्क्स, प्रिन्स क्रोपोटकीन, रस्कीन, कुमारप्पा वाचलेल्या बाबा आमटेंनी श्रमिकांची संघटना उभी केली. साऱ्याच प्रयोगांना यश नाही आलं, पण 'लढल्याशिवाय हार मानणार नाही' अशी जिद्द घेऊन जन्मलेल्या बाबांनी सतत अपयशामागे धावणं चालू ठेवलं. 'अपयशातून दिशा निश्चित होतात, अपयश नेमक्या मार्गाने नेणारे वळण असते' यावर बाबांचा विश्वास होता.

 ‘जे जगाकडे पाठ करतात, जग त्यांच्या पाठीशी उभं राहतं.' याचा प्रत्यय बाबा आमटेंना सन १९५४ साली आला. ‘सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनल' या संस्थेने ‘आनंदवन'च्या कार्याची दखल घेतली. १४ देशातील २३ भाषा बोलणारे ५0 स्वयंसेवकांचे एक पथक वरोऱ्याला आले. त्यांनी ‘आनंदवना'तील कुष्ठरोग्यांसाठी दोन इमारती श्रमदानातून उभ्या केल्या. वरोऱ्यात ही बातमी पसरली. मग रेल्वेतील हमालांनी एक विहीर खोदून दिली आणि बाबा आमटे करीत असलेल्या कार्यात समाज सहभागाची परंपरा निर्माण झाली. त्यातून आनंदवन मित्र मेळावा सुरू झाला. मध्यम व उच्च मध्यमवर्गीय समाज पायउतार झाला. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची सेवा, उपचार, पुनर्वसन केले. यापेक्षा समाजातील एक निष्क्रिय वर्ग सक्रिय सहभागी बनविला, ही गोष्ट मला अधिक महत्त्वाची वाटते. एकांताचे कैदी

प्रेरक चरित्रे/२५