पान:प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अश्रूंमधलं इंद्रधनुष्य : बाबा आमटे

सन १९६७-६८ चे दिवस. ऐन तारुण्यात मी मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात सोमनाथला होतो. बाबा आमटेंनी सुरू केलेल्या कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने त्यांना १३00 एकर जमीन दिली होती. जमिनीच्या नावाखाली शासनाने बाबांना १३00 एकराचं जंगल दिलं होतं. ते जंगल लागवडयुक्त जमिनीत बदलायचे आव्हान तरुणांना बाबांनी केलं होतं. त्यास प्रतिसाद म्हणून गेलेल्या शेकडो तरुणांतील मी एक होतो. त्या काळात मी बाबा आमटे प्रथम पाहिले. अनुभवले. नंतर मी त्यांचं ‘ज्वाला नि फुले' हे काव्य बायबलसारखं नित्य वाचतो. ‘माती जागविल त्याला मत' सारखं पुस्तक मला लोकशाहीचं महत्त्व समजावतं. ‘वर्कर्स युनव्हर्सिटी'सारखं पुस्तक श्रममहात्म्य देत राहतं.
 काही वर्षापूर्वी कोल्हापूरला रोटरी इंटरनॅशनलची एक परिषद भरली होती. बाबा त्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तेव्हा ते म्हणाले होते की, “माणसं सौंदर्य शोधण्यासाठी अजंठा-वेरूळला जातात. तिथल्या भग्न मूर्तीत माणसाचं सौंदर्य शोधतात. आपण हे विसरतो की, जोवर आपण जिवंत भग्नमूर्तीतील (कुष्ठरोगी) माणसाचं मांगल्य (करुणा) शोधणार नाही तोवर माणूस नावाचा समाज ख-या अर्थाने सुंदर होणार नाही." बाबा आमटे यांचे समग्र जीवन, कृतीपाठ हा नव्या युगाचं कृतीशील उपनिषद आहे. ज्यांना समाजातील वेदनांतून वेद निर्माण करायचे आहेत त्यांनी बाबांचे जीवन व कार्य आचारधर्म बनवायला हवे.

 बाबांना बालपणी वडिलांनी फटाक्यासाठी पैसे दिलेले. भावंडांबरोबर

प्रेरक चरित्रे/२४