पान:प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

४ पूर्व प्राथमिक शाळा, ३० प्रौढ शिक्षण केंद्रे, काही प्राथमिक प्रशिक्षण विद्यालये, बालसेविका अभ्यासक्रम, बालसेविका अभ्यासक्रम, वसतिगृहे, किसान शाळा, आरोग्य केंद्रे, मूकबधिरांसाठी शाळा, रात्रशाळा अशा नानाविध उपक्रमांची बोर्डी, कोसबाड, दाभोणचा परिसर शिक्षण स्पर्शानं रोमांचित करून टाकला. 'शबरी उद्योगालय' हे अनुताईंच्या दूरदृष्टीचे मूर्त प्रतीक होय. शिक्षणाबरोबरच आदिवासींना रोजगाराच्या संधी देऊन त्यांनी आदिवासींचे परावलंबन दूर केले. गोदावरी परूळेकरांनी वारली परिसरात माणूस जागवण्याचे कार्य केले तर जागा झालेल्या माणसास माणूस म्हणून घडवण्याचे कार्य अनुताईंनी केले.
 ‘शाळा म्हणजे मुलांच्या अंगणातील झाड' असं वरकरणी शिक्षणाचं बालबोध सूत्र सांगणाच्या अनुताईंच्या विचारात आचारपूर्ण चिंतन सामावलेले असायचे. त्यामुळे आपण जे केले त्यात त्यांना कृतार्थता वाटत राहायची. ‘कोसबाडच्या टेकडीवरून' या आपल्या आत्मपर लेखनात त्यांनी ‘कृतार्थतेने व कृतज्ञतेने जगाचा निरोप घेण्याची तयारी दर्शवली होती व ती त्यांनी सार्थ करून दाखवली. आपल्या जिवित कार्याचा त्यांना सतत ध्यास होता. ध्यासाशिवाय जीवनात सर्जनात्मकता येत नसते. जिथे सृजन नाही तिथे तिथे आनंद कुठला? अनुताई या ख-या अर्थाने वंचितांच्या वाली होत्या. उपेक्षितांबद्दल असाधारण कणव व जाणीव असलेल्या अनुताईंच्या हातून माणूस घडविण्याचे जे कार्य झाले ते त्यांच्यात वसलेल्या, सतत अस्वस्थ असलेल्या शिक्षक, समाज, कार्यकर्त्यांमुळेच.

☐☐

प्रेरक चरित्रे/२३