पान:प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf/20

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


त्यांच्या मानसन्मानाची सर्व शक्यता असताना तारा अली बेग यांनी ती दूरदृष्टीनी नाकारून आपल्या देशनिष्ठेचा परिचय दिला. पंडित नेहरूंच्या सांगण्यावरून त्या सामाजिक कार्यात आल्या. बालकल्याणकारी कार्याने त्यांनी आपल्या सामाजिक सेवेचा प्रारंभ केला. तेच त्यांचे पुढे जीवित कार्य झाले. त्यांच्या या निवडीचे अप्रूप वाटण्याचे आणखी एक कारण आहे. एक तर त्या समृद्ध नि सनातनी मुस्लीम घराण्यात दिल्या गेलेल्या. तिथल्या पारंपरिक वातावरणाचा बीमोड करण्यात त्यांनी दाखवलेले धाडस केवळ आश्चर्यकारक, शिवाय लक्ष्मी पायी लोळण घालत असताना तिकडे दुर्लक्ष करून समाजसेवेचं सतीचं वाण त्यांनी स्वीकारावं, या सर्वच गोष्टी त्यांच्या चरित्र नि चारित्र्याच्या अभ्यासात अनाकलनीय वाटतात. विशेषतः तत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर.
 तारा अली बेग यांनी ज्या काळात समाजकार्याचा श्रीगणेशा केला तेव्हा त्यांच्यापुढे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, कमलादेवी चटोपाध्याय, अली बेग (पती) यांचा आदर्श होता. त्यांच्या प्रभावाने प्रेरित होऊन त्यांची मुळात असलेली समाजसेवेची वृत्ती विकसित झाली. अल्पावधीतच त्यांनी आपल्या कार्यसातत्याने आपली वेगळी अशी प्रतिमा तयार केली. सतत १०-१२ वर्षे त्यांना महिला व बालकल्याण कार्याच्या क्षेत्रात विविध उपक्रम, संस्था इत्यादींद्वारे मोलाचे कार्य केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेल्या पहिल्या नियोजन मंडळाच्या त्या सदस्या म्हणून नियुक्त झाल्या. इतकेच नव्हे, तर या मंडळाने महिलांच्या आर्थिक व सामाजिक सर्वेक्षणासाठी जी समिती नेमली होती तिचे निमंत्रक होण्याचा बहुमानही श्रीमती बेग यांना मिळाला.

 पुढे ताराजींनी दुस-या महायुद्धात मोठ्या प्रमाणात अनाथ, निराधारांची निर्माण झालेल्या संगोपनविषयक समस्यांच्या निराकरणार्थ युरोपात स्थापन झालेल्या एस. ओ. एस. चिल्ड्रन व्हिलेज या योजनेचा अभ्यास करून ही योजना भारतात कशी राबवता येईल, याचा ध्यास घेतला. त्यांच्या या ध्यासातूनच भारतात बालग्राम चळवळीचे लोण दूरपर्यंत पसरले. या संस्थेच्या त्या सतत २२ वर्षे अध्यक्षपदी कार्यरत होत्या. त्यांच्या कार्य सातत्याचा आणखी दुसरा पुरावा तो कोणता असणार? बालग्राम योजना अनाथ, निराधार बालकांना केवळ अन्न, वस्त्र, निवारा देत नाही तर त्यापुढे जाऊन ती त्यांना आत्मसन्मान, श्रद्धा, प्रेम, स्वावलंबन देते, अशी त्यांची श्रद्धा असल्याने त्यांनी या योजनेचा हिरिरीने पुरस्कार केला.

प्रेरक चरित्रे/१९