पान:प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

केली तर आपले आचरण कालबाह्य ठरेल हे अण्णांनी पुरेपुर ओळखले होते. कमरेला वा खिशात ठेवण्याचे साखळीचे घड्याळ वापरण्यातील स्वदेशी कर्मठता न दाखवता एच. एम. टी. डे-डेटर वापरून अण्णांच्यातील विश्वस्ताने जणू आपण प्रगतीशील आहोत, हेच दाखवून दिले होते.
 मी काही काळ अण्णांच्या सहवासता होतो. अनेक विश्वस्त संस्थांत त्यांच्याबरोबर फिरण्याचा योग आला. तिथे अण्णा कधी अधिकाराच्या दर्पाने फिरले नाहीत. खरे तर दर्प ही त्यांच्या वृत्तीत न बसणारी कृती. ते सर्व संस्थांत जात तेव्हा सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहचत. त्यांच्याशी गप्पा करत करत अनेक नव्या गोष्टी सांगून जात असत. कोल्हापूरच्या ‘कोरगावकर धर्मादाय संस्थे'चे ते विश्वस्त होते. प्रभाकरपंतांच्या मृत्यूनंतर म्हणजे सन १९६८ पासून ते आमरण अध्यक्ष होते. या लेखाच्या संदर्भात सामग्रीची जुळवाजुळव करत असताना एकदा ओघाने मी श्री. अनिल कोरगावकरांना एक प्रश्न विचारला होता. त्याचे त्यांनी दिलेले उत्तर अण्णांच्या विश्वस्त भूमिकेबद्दल बरेच काही सांगून जाते. मी असे विचारले की, गेली दहाबारा वर्षे आपण अण्णांना विश्वस्त म्हणून जवळून पाहिले आहे. त्यांच्या विश्वस्त वृत्तीबद्दल आपणाला काय वाटते? क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले, “अण्णांनी मला माझ्या वडिलांच्या (कै. प्रभाकरपंतांच्या) मृत्यूनंतर वडिलांचा आधार दिला. अध्यक्ष असून अण्णा नेहमी आपण हे करू या का?' अशा सहविचाराच्या भावनेने बोलायचे. यातच विश्वस्त अण्णांचे उदात्तपण सामावलेले आहे.

 अण्णांच्यातील विश्वस्त हा मोठा चिकित्सक होता. कोणतीही गोष्ट करायची तर त्यावर दीर्घ विचार करणे हे अण्णांच्या बाबतीत ओघाने आलेच. भावनेवर आरूढ होऊन निर्णय घेतल्याचे उदाहरण अण्णांच्या बाबतीत फारसे कधी घडले नाही. सेवाग्रामच्या शेती प्रकल्पावर एकदा पाणीपुरवठ्यासाठी विहिरीवर मोटर पंप बसवण्याचा प्रस्ताव होता. अण्णांच्यासमोर जेव्हा तो आला तेव्हा अण्णांनी पहिला प्रश्न केला होता की, 'विहिरीमध्ये किती घनफूट पाणी आहे?' या प्रश्नाचे उत्तर अर्थातच योजना समोर ठेवणाच्या कार्यकर्त्यांकडे नव्हते! या नि अशा कितीतरी घटना सांगता येतील की त्यात असे दिसून येईल की, कोणतीही योजना आखत असताना अण्णांनी चिकित्सक बुद्धीशी कधी फारकत घेतल्याने दिसून येत नाही. अण्णांच्यातील विश्वस्त ही चिकित्सक वृत्ती एवढ्याचसाठी दाखवायचा, कारण त्या विश्वस्तास या गोष्टीचे सदैव भान असायचे की,

प्रेरक चरित्रे/१६