________________
॥ तीन ॥ बाळकरामांची स्त्रीविषयक आस्था मराठी विनोदी वाङ्मयाबद्दल बोलताना ' बाळकरामां'च्या विनोदी लेखनाला टाळून पुढे जाणे अशक्य आहे. नाटक, काव्य आणि विनोदी लेखन या महत्त्वाच्या तीन वाङ्मयप्रकारांमध्ये बहुमोल लेखन करणारा राम गणेश गडकरी हा अत्यंत प्रतिभासंपन्न लेखक आहे, हे निर्विवाद आहे. कवी म्हणून 'गोविंदाग्रज' आणि विनोदी लेखक म्हणून ' बाळकराम' ही टोपणनावे धारण करणारी व्यक्ती म्हणजेच राम गणेश गडकरी हे महाराष्ट्रातल्या शिक्षितांना नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. आपल्या जेमतेम पस्तीस वर्षांच्या आयुष्यात या त्रिविध वाङ्मयप्रकारांत लीलया विहार करणारा हा प्रतिभावंत होता. आधुनिक मराठी विनोदी लेखनाला विसाव्या शतकारंभी श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी प्रारंभ केला, हे सर्वज्ञात आहे. कोल्हटकरांनंतर नाव घ्यावे लागते ते ' बाळकरामां 'चेच ! किंबहुना कोल्हटकर जरी मराठी विनोदी लेखनाचे आद्य प्रवर्तक असले, तरी त्या क्षेत्रात 'गुरुसे सवाई चेला' म्हणून बाळकरामांची विशेष ख्याती आहे. जनसामान्यांच्या जीवनात विनोदाचे स्थान आधुनिक वाङ्मयात विनोदाचा अवतार हा प्रबोधनहेतूंच्या हातात हात घालूनच झाला. आजही प्रबोधनासाठी किंवा सामाजिक अपप्रवृत्तींचे दिग्दर्शन करण्यासाठी विनोदाचा वापर केला जातो. विनोदी लेखनाचा तो एक प्रवाह आहेच. ३६ प्रियतमा