Jump to content

पान:प्रियतमा.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रभावाने आलेल्या संकटाशी धीरोदात्तपणे सामना करण्यात आहे. सिंधूचे सत्त्व पाहणारा तिचा पती नायकच आहे, तर वसुंधरेचे सत्त्वहरण करण्यासाठी खलनायक कटिबद्ध आहे. वसुंधरा सिंधूसारखी शरणागत नसून कृतिशील, धीरोदात्त म्हणून तेजस्विनी आहे, असे अनेकांनी म्हटले आहे. म्हणून सिंधूवर प्रतिकूल टीका करणारांना वसुंधरा मात्र स्तुतियोग्य वाटते. 'राजसंन्यास'मधील शिवांगी ही अविवाहिता. परंतु मनाने रायाजीला • समर्पित झालेली. म्हणूनच त्याच्या राजकार्यांमध्ये निष्ठावंतपणे बळी जायला तयार झालेली. त्याच्या स्वीकृत कार्यात यश देण्यासाठी मरणाला सामोरी जाणारी. पतीच्या इच्छेसाठी प्राणत्यागाला सज्ज झालेली. एक परीने ही कुमारी पतिव्रता ! दुहेरी स्वामिनिष्ठेमुळे तिच्या सत्त्वशीलत्वाला अधिक तेज येते. 'प्रेमसंन्यास ' मधील सुशीला प्रथम समोर येते ती बालविधवा म्हणून. विवाहाच्या सर्व संधी आणि शक्यता समोर असूनही, बालपणीच विवाह होऊनही त्या 'बालपती'च्या ठायी पूर्ण निष्ठा ठेवून जीवन व्यतीत करण्याचा विडा तिने उचलला आहे. ( अखेर तिच्याशी पुनर्विवाह करू इच्छिणारा विद्याधर हाच तिचा बालपणी बेपत्ता झालेला पती निघतो, हा भाग वेगळा. ) सुशीला ही विधवा असूनही पतिव्रतेचा आदर्श आहे. कालिंदीमध्ये पतिनिष्ठेच्या जोडीला स्वामिनिष्ठाही शिवांगीप्रमाणेच आहे आपला पती वृंदावन हा वसुंधरेचा मुलगा दिनार याला मारणार आहे, हे कळताच ती त्याला या अघोरी कामापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न न करता पन्नादाईची प्रतिकृती होऊन गुप्तपणे दिनारच्या जागी पाळण्यात आपला मुलगा केतन याला ठेवते. कारण वृंदावनचे मन वळवण्याचा आधी प्रयत्न केला असता ती अयशस्वी ठरलेली आहे. शेवटी पतीला अधःपातापासून वाचविण्यासाठी पोटचे पोर ती निष्ठुरपणे बळी देऊ पाहते. सत्त्वशीलतेचा हाही एक नमुना आहे. आपल्या भाबड्या गरीब जन्मदात्याला - धुंडिराजाला आणि धाकट्या भावंडांना दारिद्र्यातून वाचवण्यासाठी पित्यासमान वृद्ध आणि लोभी धनेश्वराशी घनश्यामाच्या कपटामुळे लग्न लावण्यासाठी सिद्ध झालेली मालतीही त्यागाचा आणि कर्तव्यपरायणतेचा एक नमुना आहे. लतिका प्रारंभी फटकळ, पण नंतर तीही मैत्रिणीला आपल्या वृद्ध बापाशी - धनेश्वराशी विवाह करण्याच्या संकटातून वाचवण्यासाठी घनश्यामशी विवाहाला तयार होते, हाही त्यागाचा एक नमुना ! गडक-यांची नाटके या मराठीतल्या त्या काळातील लक्षणीय शोकान्तिका आहेत. या शोकान्तिका घडवण्यात स्त्रीपात्रांचा वाटा फार मोठा आहे. किंबहुना या स्त्रिया जर इतकी टोकाची भूमिका - मग ते पातिव्रत्य असो, त्याग असो, गडक-यांच्या नाटकांतील पातिव्रत्य २७