________________
' जन्मजन्मांतरी एकदा क्षणभरी । प्रेम लाभो तुझे शोकघाता ।' अशी अपेक्षा व्यक्त करून, आता 'अंतिम प्रेमगीत हे ।' असे गोविंदाग्रज निग्रहाने ( जणू स्वतःलाच ) बजावतात. गोविंदाग्रजांच्या कल्पकतेच्या महापुरात न्हालेली 'प्रेमाचा प्रळयकाळ' ही कविता त्यांच्या विश्वव्यापक प्रेमकल्पनेचे चित्र आहे. हिचा लेखनकाळ कळेल तर अधिक बरे होईल. परंतु तो नसला, तरी कविमनातील प्रेमकल्पनेचा मागोवा तिच्या- तूनही घेता येतो. 'बुद्ध, तुकाराम, ख्रिस्त, नानक यांच्या मनाचे गाणे असेच असावे, ' अशी टीप कवीने प्रारंभी दिली आहे. जीवनाला बद्ध करणाऱ्या लोभ, मोह, क्रोध या सर्वांचा एक ग्रास करणान्या प्रलयंकारी प्रेमाचा पूर यावा, लोंढा यावा, त्यात सर्व हीन तृणवत् वाहून जावे, प्रेमपुरात सर्व भेदाभेद ढवळून निघावे; प्रेमसागराला सदैव भरतीचीच चढती कमान असावी; स्थळकाळाची बंधने लोपून जावीत; अनंताला वळसा घालून प्रेमजलाने ब्रह्माचा कळस गाठावा आणि या प्रलयंकारी आवेगातच 'मृतविश्वाचे तेरावे' साजरे व्हावे. कविकल्पनेच्या प्रलयंकारित्वाचा नमुना म्हणजे ही कविता ! प्रेमपुरातही विश्वाचा अंत-विश्वाचे मरण पाहणारा हा लोकविलक्षण कवी आहे. अत्युत्कट, अतिसंवेदनाशील, अतितरल कल्पक मनाला लागलेला प्रीतीचा ध्यास म्हणजे गोविंदाग्रजांची प्रेमकल्पना ! तिचे अस्तित्व 'याचि देही याचि डोळा' भोगण्यासाठी हा कवी आसुसला, वेडापिसा झाला आणि अशी दिव्य प्रीतिदेवता मिठीत येण्यासाठी अस्तित्वातच नाही म्हटल्यावर अगतिक, निराश झाला. अखेर नाइलाजाने तिच्या दर्शनावर समाधान मानण्याइतपत तडजोडीला तयार झाला. गोविंदाग्रजांची प्रतिभा ही ' दिव्य ' -त्वाचा ध्यास असलेलीच आहे. वास्तवा- च्या भूमीवर तिला निराशेच्या निखाऱ्याचेच चटके बसणार, हे उघड आहे. तसे बसलेही. नाइलाजाने तिने ते सहनही केले. असा उत्कट, हळवा हळवा प्रियकर मराठी वातावरणात अगदी नवा होता. त्याने मराठी तरुण रसिकांना दोन पिढया झुलवले, हळवे केले, ही स्पष्ट वस्तुस्थिती आहे. गोविंदाग्रजांची प्रेमकल्पना २३