पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/98

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तयारी झाल्यामुळे मनोमन खात्री पण होती. त्याचं आता फळ मिळताना दिसत होता. तलाठी त्याला म्हणाला, 'सर, मुंगी घाटातून अत्यंत अरुंद मार्गावरून कावड घेऊन यात्रेकरून येताना जे दृश्य दिसतं, ते फार पाहण्यासारखं आहे. ते पाहायला जायचं का?'

 एखाद्या छोट्या पण प्रचंड कुतूहल असलेल्या बालकाप्रमाणे यात्रेमधील प्रत्येक प्रसंग, प्रत्येक दृश्य चंद्रकांत पाहात होता व यात्रेमधला जिवंतपणा व रोमांचकता टिपत होता. त्यामुळे मुंगी घाटातून येणारे कावडधारी यात्रेकरून पाहायला तोही उत्सुक होता.

 तो व तलाठी घाटमाथ्यावरील दरीच्या टोकाजवळ गेले व खोल दरीकडे पाहताना चंद्रकांत अचंबित झाला. दूरवर पसरलेली खोल दरी व पायवाटेवरून कावड घेऊन येणारे यात्रेकरू मुंगीसारखे दिसत होते. किती असीम श्रद्धा, जी यात्रेकरूंना खडतर पायी प्रवासाला प्रवृत्त करते व नामघोषात शारीरिक कष्टाचा विसर पडू शकतो. चंद्रकांत तसा नास्तिक, पण एक महसूल अधिकारी म्हणून यात्रा व्यवस्थापन करणे ही त्याची जबाबदारी होती. ती निभावताना व यात्रेचा अनुभव घेताना त्याला वाटलं की, श्रद्धा-अंधश्रद्धांच्या सीमारेषा किती पुसट आहेत! श्रद्धेचं एक आंतरिक बळ असतं, पण त्याचा समाजधारणेसाठी किती उपयोग होतो हा खरा प्रश्न आहे.

 त्याचवेळी एक पोलीस कर्मचारी पळत आला, घाबऱ्या स्वरात तलाठ्याचा कानाला लागत काही बोलू लागला. काही विपरीत तर घडलं नाही ना अशी शंका चंद्रकांतच्या मनाला स्पर्शून गेली. तो गंभीर चेहऱ्यानं त्या दोघांची देहबोली पाहात होता.

 काही क्षणांनी तलाठी त्याच्याजवळ येत हलक्या स्वरात म्हणाला, 'सर, आपण मंदिराच्या प्रवेशद्वारी तातडीनं गेलं पाहिजे. पोलीस व यात्रेकरूंमध्ये काहीतरी बाचाबाची झालेली दिसतेय. यात्रेकरू खवळलेले आहेत असं हा पोलीस म्हणतोय.'

 चंद्रकांत जलदगतीनं काही क्षणातच मंदिर परिसरात पोहोचला. मंदिराचं प्रवेशद्वार बंद झालं होतं. यात्रेकरूंची रांग खोळंबली होती. त्यांच्यात प्रचंड चलबिचल व अस्वस्थता दिसत होती. क्षणभर थांबून चंद्रकांतनं सर्वत्र भिरभिरती नजर टाकली व वातावरणाचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. त्याचवेळी एक पोलीस अधिकारी आला व म्हणाला, 'सर, मी सब इन्स्पेक्टर खान. वातावरण तप्त आहे.'

 चंद्रकांतनं त्याच्याशी व इतर कर्मचाऱ्यांशी बोलून माहिती घेतली व लक्षात

प्रशासननामा । ९७