पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/94

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होऊ नये म्हणून जिल्हास्तरावर त्याचा निपटारा करायची मोहीम तुम्ही हाती घ्यायचा. कितीतरी कळीच्या मुद्द्यांना तुम्ही हात घातलात. साधी दरवर्षीची सातबारावर पीकपाहाणी नोंदीची बाब. तलाठी चावडीवर बसून, चार लोकांना विचारून प्रत्येक कास्तकरानं काय पिकं घेतली याची नोंद करतात, त्यांना तुम्ही हनुमान पाहणी म्हणायचात. त्यावर्षी तुम्ही जाहीर केलंत की, अधिकाऱ्यांनी स्वतः एकेका गावाची जातीनं क्षेत्र नं क्षेत्र हिंडून पाहणी करून पीक नोंदी कराव्यात. तुम्ही स्वत:ला त्यातून वगळलं नाही हे विशेष. एका वृद्ध तहसीलदारासह मी सोळाशे सर्व्हे नंबर असलेल्या गावाची पीक पाहणी केली, तेव्हा तेच काय, मीही थकून गेलो होतो. पण तो अनुभव ‘आय ओपनर' होता.

 तहसीलदार, प्रांत व जिल्हाधिकारी यांनी दौऱ्याच्या वेळी दरमहा खेडेगावात काही मुक्काम करावेत असा नियम आहे. पण रेस्ट हाऊस व जीप-गाड्यांच्या जमान्यात कोणी खेडेगावी मुक्काम करीत नाही. पण तुम्ही हा उपक्रम सुरू केला. त्यामुळे प्रशासन लोकांच्याजवळ सफलतेनं गेलं. काही आडवळणी गावांना, मी सायकलवर गेलो, त्यामागे आपली प्रेरणा होती. एका गावी रात्रभर मी चक्क दारूड्यांच्या संगतीत चावडीत झोपलो होतो, छे! जागा होतो; तर दुसऱ्या एका गावी मारुतीच्या मंदिरासमोरील कट्टयावर पोलीस पाटलानं दिलेल्या नवारीच्या बाजेवर झोपलो होतो. आजही ते सारं फार दूरचं वाटतं, इतका काळ बदलला आहे. खरं सांगू, आज मीही असे मुक्काम करीत नाही.

 सर, आपला सर्वात मोठा गुण जर कोणता असेल तर गुणग्राहकतेचा! हाताखालच्या अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं आपण मनापासून कौतुक करायचा. होय! या गुणांची वरिष्ठांमध्ये किती कमतरता आहे हे मी बघितलं आहे. याबाबत सर्वात मोठे दोषी अर्थात आय.ए.एस. वाले आहेत. तुम्ही त्याला सन्माननीय अपवाद आहात, म्हणून सिद्ध होणारं हे आजच्या काळातलं सत्य आहे. ते जर प्रशासकीय टीमचे कॅप्टन असतील तर यशाचं जरूर श्रेय घ्यावं, पण त्याचवेळी अपयशाचीही जबाबदारी घेण्याचं धैर्य दाखवावं ही अपेक्षा या आय.ए.एस. नामक केडरनं कधीच पुरी केली नाही. कायम श्रेय, यश व प्रसिद्धी याचा झोत केवळ आपल्यावरच पडावा याबाबत ते दक्ष असतात. पण सर, आपण मात्र 'तो राजंहस एक' या जातकुळीचे. त्यांच्यापासून अलग! म्हणूनच आपण एक यशस्वी आदर्श प्रशासक ठरलात, पण प्रसिद्ध नाही. अर्थात त्याची तुम्हांला कधी खंत नव्हती. कारण तुम्ही खरे निष्काम कर्मयोगी.

 प्रशिक्षण कालावधीत दोन महिने मंडल अधिकारी म्हणून फेरफार नोंदी व फेरफार अपिलांचा निपटारा मोहीम हाती घेऊन मी गावोगाव मुक्काम करून

प्रशासननामा । ९३