पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/93

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 एक आठवण राज्यपालांच्या दौऱ्याची आहे. राज्याच्या घटनात्मक प्रमुखापुढे सनदी अधिकाऱ्याने कसे पेश यावे याचे ते लोभस दर्शन होते! प्रत्येक कार्यक्रम नेटका, वक्तशीर आणि नियोजनबद्ध. रात्री भोजनोत्तर राज्यपालांना निरोप दिल्यानंतर तुम्ही अकरा वाजता ऑफिसला गेलात. मला 'बरोबर या' म्हणालात. खरं तर तीन दिवस सतत राज्यपालांसोबत आपण होता व या तीन दिवसात कार्यालयात जाता आले नाही म्हणून राज्यपालांचे प्रयाण होताच तुम्ही रात्रभर कार्यालयात बसून साचलेल्या फायलींचा ढिगारा उपसला. मी अनिमिष नेत्राने पाहात होतो. त्या थकल्या देहाची, चुरचुरणाच्या नेत्रांची रात्र आजही लक्षात आहे.

 तुमची कार्यतत्परता सतत जाणवायची. सायंकाळी घरी परतताना 'आज मला वाटतं की, पगाराएवढं काम नक्कीच केलंय.' असे तुमचे उद्गार कैक वेळा ऐकले आहेत, ते हृदयावर अमिट असे कोरलेले आहेत. तुम्हाला मध्यंतरी नागिणीचा दुर्धर आजार झाला. कमरेवर दोन्ही बाजूने लालसर पट्टे उठले. अंगात शर्ट घालणेही शक्य नव्हते. घरी लुंगी लावून वावरत होतात. हसतमुखानं, वेदना सोशीत घरातून कामकाज पाहात होतात. फोनवर प्रत्यक्ष भेटीसारखं बोलून लोकांची काम करीत होतात. तशी कार्यसिद्धी दुर्मीळच. तसा आजही माझा प्रयत्न असतो. एक गमतीची बाब सांगतो. नंतर मलाही भूमला असताना नागीण झाली. कुठेतरी मी तुमच्याशी जुडलो गेलो होतो. मीही तुमचं अनुकरण करीत घरातून कामकाज बघितलं.

 तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाचे रूपच पालटून टाकलं होतं. ते लोकाभिमुख व पारदर्शी केलं. त्यासाठी जनतेच्या नित्य कामाबाबत तहसील कार्यालय माहितीफलक लावून जनतेची कामे जलदगतीने करण्याचा प्रयत्न केला. आज नगरचा कार्यालयीन कामकाजाची लखिना पॅटर्न म्हणून ओळखला जातो, तो प्रथम तुम्ही सुरू केला. त्यांनीही तुमचं ऋण व प्रेरणा मान्य केली आहे. पण मला खंत वाटते की, पद्मश्रीसारखा सन्मान लखिनांना मिळाला. खरं तर त्यावर तुमचा प्रथम अधिकार होता. तुमची प्रसिद्धीपराङ्मुखता आणि अकिंचन साधुवृत्ती स्वप्रसिद्धीचा डिंडिम करण्याआड आली. आणि त्याचे श्रेय इतरांना मिळालं त्याची, तुमचा शिष्य म्हणून आजही मला मनस्वी खंत वाटते.

 भेटणारा प्रत्येक माणूस म्हणजे तुम्हाला एक प्रश्न, एक दुःख वाट आणि तो प्रश्न सुटला पाहिजे, ते दुःख मिटलं पाहिजे, अशी आपली भाव असे.

 प्रश्नाचं, त्या दु:खाचं मूळ जाणून त्याचा या व्यक्तीप्रमाणे इतरांना त्रास

९२ । प्रशासननामा