पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/92

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 तुमच्या बैठका दोन-दोन दिवस चालत, पण त्या कधीच बोअर होत नसत. नंतर चार महिन्यांसाठी तहसीलदार म्हणून, प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून एका दुष्काळी भागात रुजू झालो. दोन दिवसातच जाणवलं की मला तहसील कार्यालयातील प्रत्येक विषय ठाऊक आहे. नेमकं काय करायचं हे ठाऊक आहे. कर्मचारी व अनेक नागरिकांनी निरोपाच्या भाषणात माझा गौरव केला. 'रावसाहेबांनी आल्या-आल्या सखोल जाणकारीनं एकेका प्रश्नाला ज्या तडफेनं हात घातला व तो सोडवला, त्याचं कौतुक करावसं वाटतं!' सर, हे खरं तर तुमचं श्रेय होतं.

 प्रोबेशन कालावधी म्हणजे पेड़ हॉलिडे असं मानलं जातं. पण माझ्यासाठी तो ‘राजा नामक प्रशासन विद्यापीठात शिकण्याचा कालखंड होता.' माझे प्रशासकीय कामाचे धडे या काळात चालू होते! तुम्ही त्या काळात मला एवढे भरभरून देत होतात की, माझी फाटकी झोळी ते ग्रहण करायला कधी कधी अपुरी पडायची. तुमच्या परीसस्पर्शानं माझं सोनं झालं. बँकेत ओव्हरटाईमही न करणारा आणि निरुद्देश कवचातलं सुरक्षित जिणं जगणारा चंद्रकांतला पाहता पाहता तुम्ही बदलून टाकलं होतं. तुमच्यातल्या ज्ञानप्रखरतेनं माझी ज्ञान घेण्याची लालसाही उफाळून आली होती. विंदा करंदीकरांच्या कवितेची एक ओळ आठवते. 'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे.' सर, तुम्ही केवळ मला एकट्यालाच भरभरून देत नव्हतात, तर तुमच्याजवळ असलेलं साऱ्यांपुढे मुक्तपणे उधळत होतात. त्यांच्यातलाच मी एक. मी तो जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न केला. अगदी मनापासून, हे नक्की.

 सर, आज पंधरा वर्षांनी हे पत्र लिहायला घेतलं. दीड वर्षाच्या तुमच्या सहवासातला तो कालखंड पुन्हा एकदा जिवंत झाला. काय लिहू नि काय नको असं मला होत आहे.

 तुमच्या सहवासातला प्रशिक्षण कालावधी गुरुकुल आश्रमासारखा ठरला. आज महसूल अधिकाऱ्यांबद्दल व एकूणच सरकारी अधिकाऱ्यांबद्दल जो तुच्छ उपहासाची भाव समाजमनावर आहे, मीही कदाचित त्यातलाच एक झालो असतो. पण मला तुम्ही योग्य वेळी, योग्य वळणावर भेटलात. प्रशासनातही सामाजिक बांधिलकी जपता येते, याचा गुरुमंत्र दिलात. खाजगी क्षेत्राप्रमाणे सरकारी क्षेत्रातही अचूक नियोजनाचा ध्यासच घेता येतो असं नाही, तर तो जपता येतो, हे तुमच्या कामातून शिकलो. त्याचे धडे मी आजही गिरवत आहे.

 महात्मा गांधींबद्दल बर्नाड शॉ जे म्हणाला ते तुम्हालाही लागू पडतं. 'यू आर टू ग्रेट टु बिलीव्ह...'

प्रशासननामा । ९१