पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/91

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जरूर मिळाला की, बँकेची आरामशीर नोकरी सोडून प्रशासनाच्या धकाधकीत येण्याचा आपला निर्णय चुकला नाही. अँड आय डीपली फेल्ट देंट, आय ॲम इन सेफ हँडस् हू कॅन मोल्ड मी इन राईट डायरेक्शन!

 त्यानंतर पुढील आठवड्यात तुम्ही बोलावलेली व माझी पहिलीच असलेली महसूल अधिकाऱ्यांची बैठक मला आठवते. जवळपास शंभर विषय कार्यक्रमपत्रिकेवर होते. दोन दिवस ती मीटिंग सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत चालली होती. ती मीटिंग माझ्यासाठी सर, एक ग्रेट अशी ‘लर्निंग प्रोसेस' होती. हीच काय, पण तुमच्या कलेक्टरशिपच्या काळातली प्रत्येक बैठक मला काही ना काही शिकवून गेली. सर, मी तोंडदेखली तारीफ करणार नाही, पण खरंच, बैठक कशी घ्यावी याचा वस्तुपाठ म्हणून तुमच्या बैठकीकडे मी अंगुलीनिर्देश करीन. तुम्ही खरंच हाडाचे शिक्षक आहात. तुमची बैठक ही केवळ कामाचा आढावा घेणारी व काम कमी झालं, शासकीय उद्दिष्टांची पूर्ती झाली नाही म्हणून अधिकाऱ्यांना केवळ झापाझापी करणारी नसते, तर प्रत्येक विषयाचं महत्त्व समजावून सांगणं, तिचं स्वरूप लक्षात येऊन कामाचं नियोजन करणं आणि अंमलबजावणी कशी, किती टप्प्यात व किती वेळात करावी, सारं तुम्ही प्रभावीपणे सांगता. त्यामुळे कुणाही अधिकाऱ्याच्या मनात काही शंका उरत नाही आणि त्यामुळे सर्वांचं काम उंचावलं जातं!

 सर, त्या बैठकीचा एक विषय होता. 'सातबाराचे पुनर्लेखन.' जमिनीच्या मालकीचा आणि पीकपाण्याची नोंदी असणारा हा महत्त्वाचा अभिलेख शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा. एक सातबारा नोंदवहीं साधारणपणे दहा वर्ष चालते. त्यानंतर जागा संपल्यामुळे नव्याने सातबारा लिहून अंमलात आणावा लागतो. त्यावेळी तलाठी प्रचंड घोटाळे करतात, काही नोंदी उडवतात. त्यामुळे अपील प्रकरणे उद्भवतात. हे सारे संभाव्य धोके तुम्ही बैठकीत पोटतिडकीने मांडले होते.

 ‘सातबाराचे पुनर्लेखन करताना एकही चूक होणार नाही याची काळजी तहसीलदारांनी घेतली पाहिजे. गावात खऱ्या अर्थानं ग्रामसभासदृश सभा बोलावून गावकऱ्यांसमक्ष जाहीर वाचन करा आणि लोकांना जुना व नवा सातबारा द्या. सर्व तलाठ्यांना लेखी सूचना द्या, पुनर्लेखनानंतर याबाबत ज्या गावाचं चुकीच्या नोंदी बाबतचे अपील दाखल होईल, त्या तलाठ्याला तत्काळ निलंबीत करण्यात येईल.'

 सर, आपण या विषयावर अर्धा तास चर्चा केली. तुम्ही यातले से संभाव्य धोके व शेतकऱ्यांचे होणारे हाल याबाबत जे बोललात त्याचा ठसा मनावर कायम आहे.

९० । प्रशासननामा