पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/87

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्पर्धा घेतल्या होत्या, तशाच नेटकेपणाने स्पर्धा पार पाडल्या. प्रधानांचा जबरदस्त विरोध व कलेक्टर ऑफिसचं असहकार्य असूनही मी सरळ जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांना सारा प्रकार कथन केला व त्यांनी मदतीचे आश्वासन दिले. खऱ्या स्पोर्टस्मनप्रमाणे त्यांनी मदतीचा हात दिला. नगराध्यक्ष लालाणी माझे जुने मित्र, त्यांच्यामुळे नगरपालिकेची यंत्रणा मदतीला मिळाली. स्पर्धा यशस्वी केल्या.

 उद्घाटन सोहळ्याला प्रधानांनाही मानानं बोलावून स्टेजवर बसवले. त्यांच्या मदतीविना झालेला तो नेत्रदीपक सोहळा पाहून कदाचित त्यांनाच मनोमन संकोच वाटला असावा. त्यांनी समारोपाच्या दिवशी सांयकाळी सर्व खेळाडूंना त्यांच्यामार्फत जेवण देण्यात येईल असं जाहीर केलं.

 प्रधानांनी महसूल खात्याच्या परंपरेनुसार तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना भोजन समारंभासाठी मुक्रर केलं. दुपारपासून त्यांच्या तलाठी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा फौजफाटा कामाला लागला. भोजनासाठी केटरर नेमला होता. समारंभ सुरू होण्यापूर्वीच कलेक्टर ऑफिसचे व तहसीलचे तमाम कर्मचारी जेवणावर हात मारून गेले. याची मला कल्पना नव्हती. कारण मी समारोप समारंभात गुंतलो होतो.

 समारोपानंतर खेळाडू भोजनासाठी गेले. हजार लोकांचे भोजन झाले आणि सारे अन्न संपून गेले. कारण महसूल कर्मचाऱ्यांनी मारलेला भोजनावरचा ताव.

 अजून पंधराशे खेळाडू जेवायचे होते. जेवण नसल्यामुळे ते अस्वस्थ होते. त्याच वेळी फरकॅप चढवून प्रधान आले. त्यांनी हौसेने बोलावलेला स्थानिक वाद्यवृंद योजल्याप्रमाणे धून आळवू लागला. ‘स्वागतम्-शुभ स्वागतम्.'

 खेळाडू संतापले. त्यांना कलेक्टरांच्या स्पर्धेवरील अघोषित बहिष्काराची व असहकाराची कुणकुण लागलेली होतीच आणि मोठ्या ऐटीत जाहीर केलेल्या भोजन समारंभात त्यांना जेवण मिळत नव्हतं आणि वाद्यवृंद खेळाडूऐवजी यजमान कलेक्टरांचं स्वागत करीत होता. एक पंजाबी खेळाडू मला म्हणाला,

 ‘सर, कमाल हो गया. महेमान हम है । स्वागत हमारा होना चाहिए होस्टही खुदको वेलकम करता है और हमे भूखा रखता है?'

 त्यानं साऱ्यांच्या संतापाला जणू वाचाच फोडली होती. पाहता पाहता वातावरण स्फोटक बनलं. प्रधानांना त्याची खबर नव्हती. ते स्टेजवर झोकात बसले होते. पण प्रांत अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिका-यांनी प्रसंगाच गांभीर्य जाणलं होतं. ते माझ्याशी काय करावं याबाबत चर्चा करीत असताना खेळाडूंचा एक जथा स्टेजवर गेला आणि कलेक्टरांना हूट आऊट करू लागला.

८६ । प्रशासननामा