पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/85

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुरवायचं मान्य केलं आहे.'

 ‘छान. मुलींना वेळेवर नाष्टा, जेवण मिळायला हवं याची पूर्ण काळजी घ्या. या खेळाडू मुलींचे कोवळं, वाढतं वय आहे. त्यात पुन्हा प्रॅक्टिस सेशन आणि प्रत्यक्ष स्पर्धेचा खेळ यामुळे त्यांना प्रचंड भुका लागत असणार. आपण त्यांच्या भुकेची काळजी घेतली पाहिजे.'

 राजेंची ती 'पर्सनल टच' असलेली प्रशासनशैली पाहून सर्व थक्क झाले.

 राऊंड पूर्ण झाला. ठोंबरेंना वाटलं की आता सर बंगल्यावर जातील. पण त्यांनी तहसीलदारांना सूचना केली, 'चला तुमच्या ऑफिसला. तुमच्या कस्टडीतला तो माणूस मला पहायचा आहे.'

 ठोंबरेंना कसलाच अर्थबोध झाला नाही. त्यांची गोंधळलेली मुद्रा पाहून खुलासा करीत राजे म्हणाले,

 ‘ठोंबरे, काल मध्यरात्री मी, तुम्ही जाऊन आल्यानंतर शाळांचा राऊंड घेतला होता. मुलींसाठी सुरक्षा व्यवस्था बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी. रात्री अकराच्या सुमारास डावरे हायस्कूलमध्ये एका जिल्ह्याचा संघ प्रशिक्षक जाम प्यालेला दिसून आला. तो एका दारावर थापा मारीत एका मुलीला नशेमध्ये ‘बाहेर ये' म्हणत होता. मी त्याची गचांडी पकडून त्याला पोलीस सबइन्स्पेक्टरच्या गाडीत टाकलं आणि रावसाहेबांच्या मॅजेस्ट्रिअल कस्टडीत रवानगी केली.

 मॅजेस्ट्रिअल कस्टडीतल्या त्या शिक्षकाला पाहताच ठोंबरे म्हणाले, 'सर, याला मी चांगला ओळखतो. कारण त्या जिल्ह्यात मी क्रीडा अधिकारी होतो. पक्का बेवडा आहे. चारित्र्यही संशयास्पद आहे. मी तेव्हाच शिक्षण अधिकाऱ्यांना लेखी अहवाल देऊन याला संघाबरोबर कुठे पाठवू नये असे म्हटले होते.

 ‘तुम्ही इथं थांबा आणि काही व्यवस्था करून त्याला परत पाठवून द्या. मी तिथल्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांशी बोललो आहे. हा जेव्हा तिथे पोचेल, तेव्हा निलंबित झालेला असेल.'

 'सर, प्लीज माझ्यावर दया करा. मला निलंबित करू नका. मी पुन्हा अस वर्तन करणार नाही.' कोठडीत रात्रभर राहून नशा पार उतरलेला, संघ प्रशिक्षक म्हणून मुलींच्या टीमसोबत आलेला शिक्षक चक्क राजेंच्या पाया पडला.

 ‘तुम्हाला दया नाही. इथं माझ्या जिल्ह्याच्या इभ्रतीचा आणि त्या कोवळ्या निष्पाप मुलीच्या जीवनाचा प्रश्न होता. मी रात्री राऊंडला आलो नसतो तर...आय जस्ट कान्ट इमॅजिन. तुम्हाला क्षमा नाही...'

 ‘राजे सरांच्या या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर येथे त्यानंतर पाच-सहा वर्षांनी

८४ । प्रशासननामा