चंद्रकांत म्हणाला, 'हे रोजचं आहे. आमचे कलेक्टर तर गमतीनं म्हणतात, ज्या दिवशी ऑफिसला येताना उपोषणासारखे प्रकार व तंबू दिसत नाहीत, त्यादिवशी चुकल्यासारखं होतं!'
ऑफिसला आल्याआल्या चंद्रकांतने गृहशाखा सांभाळणाऱ्या पेशकरांना बोलावून विचारले, 'आज सर्व उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी झालीय ना? काल दोघांचा बी.पी. वाढला होता. ते कसे आहेत? गुड! त्यांना दवाखान्यात भरती केलं ते ठीक झालं. होम डी.वाय.एस.पी.ला सांगून पोलिसांचा बंदोबस्त वाढवा. त्यांना सांगून तंबूत बसवलेली माईक सिस्टिम काढून टाका. उगीच दिवसभर घोषणांच्या मोठ्या आवाजानं ध्वनिप्रदूषण तेवढं वाढत जातं आणि काम डिस्टर्ब होतं.'
साडे अकराच्या सुमाराला एक स्थानिक नगरसेवक आला. पन्नास बेरोजगार तरुण उपोषणाला बसून तीन दिवस झाले तरी दखल का घेत नाही, असा जाब निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत याला विचारू लागला. चंद्रकांतच्या उत्तराने तो क्षणभर हतबुद्ध झाला, काय करावे हे त्याला उमगेना!
स्वर खाली आणून तो म्हणाला, 'साहेब, काहीतरी तडजोड करून उपोषण मिटवलं पाहिजे, नाहीतर नस्ती आफत ओढवेल.'
'ठीक आहे. तुम्ही त्यांच्या नेत्यांना दालनात घेऊन या. आपण चर्चा करून मार्ग काढू या!'
नगरसेवकाचा चेहरा उजळला. 'मी त्यांच्याशी बातचीत करून त्यांना राजी करतो व अर्ध्या तासात त्यांना इथे चर्चेला घेऊन येतो.'
तो बाहेर गेल्यावर चंद्रकांत इनसायडरला म्हणाला, 'तुला कदाचित वाटत असेल, प्रशासन एवढं असं संवेदनाहीन कसं? तीन दिवस झाले उपोषण चालू आहे, तरी आम्ही दखल का घेत नाही? मी राजकी बात सांगतो. कोणतेही उपोषण पहिल्या दिवशी कधीच समाप्त होत नाही. तसं ते झालं तर त्याला पुरेशी प्रसिद्धी मिळत नाही. त्याचं महत्त्व राज्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही. आणि सुरवातीला उपोषणकर्ते पण जोशात असतात. त्यामुळे ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात. म्हणून त्यावेळी चर्चा करून काही उपयोग नसतो.
'लोखंडावर ते तापल्यावरच घाव घालायचा असतो, तरच तुकडा पडतो, या न्यायानं थोडी प्रसिद्धी झाल्यावर आणि भुकेचे चटके बसू लागल्यावर सारे हबकतात. कोणीतरी स्वयंभू पुढारी मध्यस्थीसाठी येतो. मग मी उपोषण मिटविण्याचा प्रयत्न सुरू करतो. कारण तीच अनुकूल वेळ असते. अनुभवाने उपोषण मिटवण्याचा हा मंत्र शिकलो आहे.'प्रशासननामा । ६९