पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/83

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



कहाँ राजा भोज...



 कलेक्टर वा जिल्हाधिकारी ही फार महत्त्वाची प्रशासकीय संस्था आहे. ब्रिटिशकालीन पंरपरा आणि दबदब्यामुळे या पदाचा कल्पक समाजोपयोगी वापर करू शकतो. तर आत्मकेंद्री ब्युरोक्रेटिक कलेक्टर चांगल्या कामातही घोळ घालू शकतो. वेळकाढूपणा करीत निर्णय लांबवू शकतो. त्याला अपवाद असलेले दुर्मीळ जातीचे कलेक्टर म्हणून राजे होते.

 राजे वेळेच्या बाबतीत पक्के इंग्रज होते. त्यांनी पहाटे पाचला राऊंड घेण्याची सूचना दिली, म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी ठोंबरे त्यांच्या बंगल्यावर बरोबर पावणेपाचला हजर झाले.

 खरं तर, आदल्या दिवशी सकाळीच राज्यस्तरीय महिला क्रीडास्पर्धेचे उद्घाटन झाले होते! त्या सोहळ्याची आखणी स्वत: राजेंनी केली होती आणि त्याबरहुकूम ठोंबरे यांनी ती राबवली होती. राज्याच्या सर्व जिल्ह्यांतून सर्व खेळांसाठी तीन हजार शालेय मुली नांदेडला, तीन दिवसासाठी हजर झाल्या होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय क्रीडास्पर्धा प्रथमच भरत होती. ठोंबरे जिल्हा क्रीडा अधिकारी होते. जिल्हा बहुविध खेळ समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कलेक्टर स्पर्धेचे यजमान होते. तीन हजार मुलींची निवास-भोजनाची व्यवस्था, खेळाच्या स्पर्धेसाठी नगरपरिषदेचे स्टेडियम व इतर मैदाने तयार करून घेणे आणि उद्घाटन समारंभाची कल्पक आखणी करणे, अशी अनेक कामे होती. कलेक्टर राजे दररोज सायंकाळी पाच नंतरचा वेळ क्रीडा स्पर्धेच्या नियोजनासाठी देत होते.

 या नियोजनबद्ध कामाचे फळ म्हणजे भव्य उद्घाटन समारंभ. ठोंबरे भरून पावले होते. सर्वच अधिकारी थक्क झाले होते. त्यासाठी लागणारा खर्च राजे सरांनी स्मरणिकेच्या जाहिरातीतून उभारला होता. मंजूर रकमेच्या चौपट रक्कम गोळा केली होती. साऱ्या महिला खेळाडू, त्यांचे संघ प्रशिक्षक, टीम मॅनेजर व विविध जिल्ह्यांतून आलेले सारे क्रीडा अधिकारी चोख व निर्दोष व्यवस्थेने

८२ । प्रशासननामा