पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/81

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भीतीनं पांढराफटक पडला.

 ‘स..सर...आपण तर पूर्ण तपास केला आहे... पुन्हा हे काय?'

 ‘मनात शंका आली म्हणून. तिचं निरसन करून घ्यायचं एवढंच!'

 ‘मला दुसरं एक अर्जंट काम आहे. जरा दुकानात जाऊन आलं पाहिजे. तो कसाबसा म्हणाला,

 चंद्रकांतनं मनाशी विचार करून त्याला परवानगी दिली. बरोबर बारा वाजता बँकेत येण्याची सूचना केली. तो अक्षरश: धावतच दालनाबाहेर गेला.

 चंद्रकांतला खात्री होती की, मुनीमजी आता बद्रीप्रसादकडे जातील व बँकेला फोन करून कदाचित डॉक्युमेंट्स दाखवू नयेत, असं कळवतील. बँकही ‘व्यक्तिगत ग्राहकाची गोपनीयता जपण्याच्या नावाखाली नाही म्हणेल...हे सारं घडलं तर नक्कीच माने प्रकरणाचा खरा सूत्रधार बद्रीप्रसाद आहे हे सिद्ध होईल व त्याच्याविरुद्ध पुरावा सापडू शकेल.

 तो कलेक्टरकडे गेला व त्यांना सारं कथन करून म्हणाला,

 ‘सर, आपण बँकेच्या रिजनल मॅनेजरला बोलावून मला ते व्हाऊचर पाहण्याची परवानगी देण्याची सूचना करा. मला खात्री आहे, माझा अंदाज खोटा ठरणार नाही.'

 चंद्रकांत बँकेत पोचला तेव्हा तिथं बद्रीप्रसाद व मुनीमजी हजर होते; पण त्याच्याशी न बोलता तो सरळ मॅनेजरच्या केबिनमध्ये गेला. त्यांना रिजनल मॅनेजरचा फोन आल्यामुळे त्यांनी व्हाऊचर काढून ठेवले होते. त्यावरून मानेच्या नावाने दोन टँकर्सचे पैसे बद्रीप्रसादच्या मुनिमाने भरले होते व तो डी.डी. घेऊन मूनिमानेच रॉकेल कंपनीच्या कार्यालयात जाऊन रॉकेलचे भरलेले टँकर्स घेतले होते, हे आता कागदोपत्री सिद्ध होत होतं! कारण मानेच्या नावाने डी.डी.साठी व्हाऊचर्स भरताना मुनीमने नेहमीच्या सवयीने ‘बद्रीप्रसाद अँड कंपनी' चा रबर स्टॅप मारून आपली सही केली होती. तिथंच तो फसला होता.

 चंद्रकांतनं रुद्रावतार धारण करताच मुनिमानं कबुली जबाब दिला. चंद्रकांत मग अधिक खोलात गेला व त्यानं एक वर्षाचे सर्व व्हाऊचर्स तपासले. तेव्हा अनेक किरकोळ आणि सब एजंटांच्या नावाने ‘बद्रीप्रसाद अँड कंपनीने पैसे भरण्याचे व ते टँकर्स उचलल्याचे निष्पन्न झाले. एवढा भरभक्कम पुरावा हाती आल्यावर बद्रीप्रसादचा परवाना रद्द करताना काही अडचण आली नाही

 शहराच्या केरोसिन किंगचा रॉकेलचा ठोक व किरकोळ परवाना रद्द होणे ही धक्कादायक बातमी होती. त्याचा परिणाम जसा अपेक्षित होता तसाच दिसून आला. रॉकेल टंचाई संपुष्टात आली व प्रत्येक एजंट व विक्रेत्याकडे

८0 । प्रशासननामा