पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/75

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आम्हा प्रशासकांची असते. उपोषण सोडवणे व मोर्चा कौशल्याने हाताळणे यातच आमची सारी शक्ती खर्ची पडत असते. त्यांच्या समस्येवर विचार करून काही ठोस कृती करण्यासाठी वेळ व सवड मिळत नाही. तसेच, चिंतन नसल्यामुळे राज्यकर्त्यांना काही नव्या योजना सुचवताही येत नाहीत. चाकोरीबाहेर जाऊन याबाबत काही करू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना शासन व लोकप्रतिनिधी साथ देतातच असे नाही. ही आमची मजबूरी आहे.'

 इनसायडर विचार करीत होता. जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी योग्य धोरणे आखणे हे लोकप्रतिनिधींचे काम आहे, तर त्या धोरणांची प्रामाणिक व जनहितार्थ नीटपणे अंमलबजावणी करणे हे नोकरशाहीचे -प्रशासकांचे काम. पण लोकप्रतिनिधी व प्रशासक ही देशप्रशासनाची दोन चाके समांतर का चालत नाहीत? एक चाक बेगुमानपणे नको त्या दिशेने का धावते ? आणि दुसन्या चाकाला नियमाच्या बद्धतेने त्याच्या गतीशी गती मिळवत जे चाललंय ते योग्य नाही असे वाटत असलं तरी चालावे लागते किंवा आपली बुद्धी गहाण ठेवून वागावे लागते.

 त्यामुळे अन्न, वस्त्र निवारादी मूलभूत प्रश्नही सुटत नाहीत. त्याचे नेमके वर्णन मनोजकुमारच्या सिनेमातील या गीतानं किती प्रभावीपणे केले आहे.

'जीवन के बस तीन निशान
रोटी कपडा और मकान ।
मांग मांग के हर इन्सान
हो रहा है बस परेशान ।'


७४ । प्रशासननामा