पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/74

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाटत नाही. कारण तुमच्या सूतगिरणीचा प्रश्न मला माहीत आहे. म्हणून स्पष्टपणे सांगावेसे वाटते की, तुम्हाला आपल्या पोटापाण्याची चिंता असेल तर काही दिवस अर्ध्या वा पाऊण पगारात काम करून अधिक उत्पादन दिले पाहिजे. बोनसची मागणी सोडून दिली पाहिजे. हे मान्य असेल तर मी पुन्हा प्रयत्न करायला तयार आहे.'

 चंद्रकांतचे हे परखड अंजन घालणारे मत समजून घेण्याच्या मन:स्थितीत मोर्चेकरी नव्हते. 'तुम्ही शासनाला आमचे निवेदन पाठवा, सूत गिरणी पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाने पाच कोटी रुपये द्यावे. अशा मागणीची शिफारस करा.' असेच ते पुन्हा पुन्हा सांगत राहिले. चंद्रकांतने तसे अखेरीस नाईलाजानं तोंडभरून आश्वासन दिले, तेव्हा ते कामगार विजय प्राप्त केल्याच्या दिमाखात परत गेले.

 'आय हेट पॉलिटिक्स- प्रिसाईजली फॉर धिस. या पुढाऱ्यांनीच सूतगिरणीची वाट लावली. कामगारांना अवाजवी वेतनवाढ देऊन लाडावून ठेवलं. परिणाम काय झाला? शेतकऱ्यांच्या कापसाला बाजारपेठ मिळवून देणारी एक चांगली नफ्यातली गिरणी बंद पडली. मला या कामगारांचे कळत नाही. ते त्यांची जिंदगी बदबाद करणाच्या नादान पुढाऱ्यांकडेच जादा पगाराच्या आशेने पुन्हा जातातच कसे? उत्पादकतेशी निगडित वेतनवाढीची अट मान्य करीत नाहीत. अर्थात त्यांचाही दोष नाही. त्यांना पुढाऱ्यांनी केवळ हक्कच शिकवले आहेत. कर्तव्ये नाहीत.'

 त्यादिवशी दुपारी चंद्रकांतने दुसरे उपोषणही असेच प्रशासकीय कौशल्य पणाला लावून सोडवले. ते उपोषण ‘इंदिरा आवास योजने' खाली घर मिळावे म्हणून. बेघर, दारिद्रय रेषेखालील लोकांच्या यादीमध्ये त्यांची नावे समाविष्ट झाली नव्हती, त्यामुळे त्यांना शासनातर्फे मोफत घरकुले मिळाली नव्हती. पुनर्सर्वेक्षण करून पुढील वर्षी त्यांना घरकुले दिली जातील, असे आश्वासन चंद्रकांतने देऊन त्यांचेही उपोषण लिंबू पाणी पाजवून सोडवले.

 सायंकाळी बंगल्याबाहेरील लॉनवर चहा घेत चंद्रकांतने इनसायडरला म्हटले, 'मित्रा, आजची दोन उपोषणे व एक मोर्चा म्हणजे जनतेच्या रोटी, कपड़ा और मकान या मूलभूत समस्येचे दर्शन घडविणारे होते. या गरजा न भागणाऱ्या लोकांची आगतिकता व क्षुब्धावस्था मला समजते. त्यांच्याजवळ उपोषण व मोर्चाखेरीज मागणी प्रगट करण्याचे दुसरे हत्यार नाही. हे हत्यारही अतिवापराने बोथट झाले आहे. हे त्यांना माहीत नसते असे नाही; पण काहीतरी केले पाहिजे म्हणून त्यांचे आयोजन होत असते. ही त्यांची मजबूरी असते. तशीच मजबूरी

प्रशासननामा । 73