पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/72

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ‘तुमचा प्रश्न खरा आहे. मित्रांनो, मी शासनाला पुन्हा एकवार तुमच्या तीव्र भावना कळवीन; पण आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे. दोघांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना दवाखान्यात ॲडमिट केलं आहे. तेव्हा माझी विनंती आहे की, आपण उपोषण मागे घ्यावं.'

 ‘पण त्यांच्या मागण्यांचं काय साहेब?' नगरसेवकानं विचारलं.

 'त्या प्रामुख्याने शासनाच्या अखत्यारीतल्या आहेत. मला त्याबाबत काही सांगता येणार नाही; पण अंशत: हा प्रश्न स्थानिक पातळीवर सुटू शकेल. त्यासाठी नगरसेवक व सत्तारूढ आघाडीचे नेते म्हणून तुमची तयारी असेल तरं.'

 ‘पूर्ण तयारी आहे साहेब.' आपल्याला आर.डी.सी.नी महत्त्व दिल्यामुळे संतुष्ट झालेला नगरसेवक आपला रुंद चेहरा अधिकच रुंद करीत म्हणाला,

 ‘आपली पोरं आहेत. त्यांच्यासाठी जीव कळवळतो बघा. तुम्ही सांगाआपण ते करू.'

 ‘सध्या नगरपरिषदेमध्ये काही पदे सेवानिवृत्तीनं रिक्त झाली आहेत. त्यातील 'ओपन' ची पदे तुम्हाला प्रकल्पग्रस्त व स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांमधून भरता येतील. तसे शासनाचे आदेश आहेत. ही पदे अर्ज मागवून, केवळ इंटरव्ह्यू घेऊन इतर कोणते सोपस्कार न करता भरण्याचे अधिकार नगराध्यक्षांना व मुख्य अधिकाऱ्याना आहेत. मी कलेक्टरसाहेबांच्या सहीनं तसे निर्देश देऊ शकतो.'

 नगरसेवकाला ही तडजोड पसंत पडली. थोडी चर्चा होऊन, चंद्रकांतच्या हस्ते लिंबूपाणी देऊन उपोषणाची 'यशस्वी' सांगता झाली.

 'चंद्रकांत, हे असं उपोषणकर्त्यांच्या नेत्यांना आमिष दाखवून उपोषण समाप्त करणे अनैतिक नाही वाटत? दोन-चार जणांना नोकऱ्या मिळून का हा प्रश्न सुटणार आहे?'

 'मी इथं प्रशासकाच्या भूमिकेत आहे. प्रश्न चिघळू नयेत व त्यांना विपरीत वळण लागू नये म्हणून प्रयत्न करणे माझे आद्य कर्तव्य आहे. नोकऱ्या देणे व बेरोजगारीचे निर्मूलन करणे हे शासनाचे धोरणात्मक अधिकार आहेत.' चंद्रकांतच्या स्वरातून विषाद टपकत होता.

 ‘मजबूर हम-मजबूर तुम अशी आपली अवस्था आहे. उपोषणकर्त्यांना का हे माहीत नाही? उपोषण करून नोकऱ्या मिळत नसतात. पण वाढती लोकसंख्या, कुंठित अर्थव्यवस्था आणि संगणकीकरणाच्या जमान्यात नव्या नोकऱ्या कमी कमी होताहेत. या प्रश्नाचं उत्तर स्वयंरोजगारात आहे, हेही पटवून देण्याचा माझा प्रयत्न आहे, पण उपोषणकर्त्यांना ते समजून कुठे घ्यायचं असतं?'

प्रशासननामा । ७१