पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 चंद्रकांत इनसायडरला प्रशासनाचे मंत्र सांगत होता.

 ‘प्रशासनाला भिन्न भिन्न प्रकारचे प्रश्न हाताळावे लागतात व त्यासाठी पब्लिकची मानसिकता अचूकपणे जाणून घेण्याची गरज असते.'

 'हे बेरोजगार युवकमंचाचे उपोषण घे. शहराच्या हद्दी वाढल्यामुळे नव्या विभागात नागरी सुविधा पुरविण्यासाठी नवीन शंभर पदे शासनाने मंजूर करावीत, म्हणून नगरपालिकेने ठराव केला आणि तो आमच्यामार्फत शासनाकडे पाठविला. त्यामुळे बेकार युवकांच्या आशा जागृत झाल्या आहेत. पण शासन पदनिर्मितीचा प्रस्ताव मंजूर करणार नाही. कारण नगरपालिकेचा आस्थापनेचा खर्च आताच सत्तर टक्के झाला आहे, ही शंभर पदे मंजूर होऊन भरली गेली तो त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत पंचाहत्तर टक्के होईल. त्यामुळे तो मंजूर होणे केवळ अशक्य आहे.'

 'ही बाब नगरसेवकाला माहीत नाही का?'

 ‘नसायला काय झालं? तरीही अशाप्रकारे बेरोजगारांना उचकावून देत शासनावर दबाव आणणे व पदे मंजूर करून घेणे, हा उद्देश या मागे आहे. माझ्या माहीतीप्रमाणे हा नगरसेवकच या उपोषणामागे आहे.'

 'आय सी! पण चंद्रकांत, आज तर हा प्रश्न सुटणारा नाही. मग उपोषण मागे घेतील?'

 'नक्की. तू पाहाच. कारण कोणतेही उपोषण हे कधीच खऱ्या अर्थान आमरण नसते. ते एक राजकीय शस्त्र आहे. मागण्यांकडे लक्ष वेधण्याचे व प्रश्न धसास लावण्याचं.' चंद्रकांत शांतपणे म्हणाला, 'हा नगरसेवकच मध्यस्थी करून उपोषण मागे घ्यायला लावेल. त्यासाठी मला थातूरमातूर आश्वासन द्यावं लागेल. तेवढीच त्याला तोंड दाखवायला जागा.'

 नगरसेवकासोबत पाच उपोषणकर्ते आले. पाऊणतास चर्चा झाला. कमालीच्या संयमाने व शांतपणे चंद्रकांत हे नाजूक प्रकार हाताळत होता. सुरुवातीला उपोषणकर्ते जोशात होते. त्यांना त्यांच्या तोंडातील वाफ पुरेशा दवडू दिल्यानंतर चंद्रकांतने नगरपरिषदेची आर्थिक स्थिती व आस्थापनेचा खर्च वाढला तर विकासकामांना खीळ बसेल, यासाठी खर्चावर शासनाने घातलेला मर्यादा वगैरे सांगून ही मागणी कशी अवाजवी आहे हे समजावून सांगितले. त्याच्या बौद्धिक प्रवचनाने तीन दिवसांच्या उपाशी तरुणाचं समाधान होणे शक्य नव्हते; पण तरीही त्यांना उपोषण संपविण्याची घाई झाली होती. यातून थातूरमातूर का होईना आश्वासन हवं होतं. ते देण्याची चंद्रकांतची तयारी होती. पण त्यांना तडजोडीच्या बिंदूपर्यंत खेचणं भाग होतं. त्यासाठी अनावश्यक वेळकाढू चर्चा चालू होती.

७0 । प्रशासननामा