पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/69

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



रोटी, कपडा और मकान !



 ‘तीन दिवस झाले, साहेब, बेरोजगार युवक मंचाचे तरुण उपोषणाला बसले आहेत; तुम्ही अजून त्यांची साधी दखलही घेतली नाही.'

 कार्यकर्ते व पत्रकार यांच्यासह जोशामध्ये चंद्रकांतच्या दालनामध्ये येऊन तावातावानं एक नगरसेवक विचारत होता.

 चंद्रकांतने शांतपणे गंभीर चेहऱ्या ने म्हटले,

 'तुम्ही असं कसं म्हणता ? उपोषणाच्या नोटिसीबरोबर आलेलं त्यांचं निवेदन मी शासनाकडे त्याच दिवशी फॅक्स केलं आहे, झालंच तर, त्यांना पत्र देऊन उपोषणाला बसू नका अशी विनंती केली आहे. कारण हा प्रश्न शासनाच्या अखत्यारीतला आहे.'

 इनसायडर चंद्रकांतच्या बाजूला बसून हा प्रकार पाहत होता. सकाळी घरी चंद्रकांत त्याला म्हणाला होता, 'चल माझ्यासोबत ऑफिसला आज! मला दोन उपोषणांना आणि एका मोर्चाला सामोरे जायचे आहे. सवयीनं हे सार अंगवळणी पडलं असलं तरी उपोषणामागची समस्या अनेकदा खरी व दाहक असते. त्यावर आमच्यामार्फत केवळ मलमपट्टीच केली जाते. अशावेळी एक प्रकारची मजबुरी, अगतिकता जाणवते आणि मी मनोमन सुन्न होऊन जात असतो; पण शो मस्ट गो ऑन या तत्त्वाप्रमाणे आम्हा प्रशासकांनाही नित्य नव्या समस्यांना सामोरे जावं लागतं. त्या सुटोत वा न सुटोत, किमान चिघळणार नाहीत. याची काळजी घ्यावी लागते.'

 कलेक्टर कचेरीच्या भव्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन तंबू उभे राहिल होते. त्यात दोन उपोषणे चालू होती. तेथे बऱ्यापैकी गर्दी होती.

 चंद्रकांतची लाल दिव्याची मारुती जिप्सी दिसताच घसा खरवडत दोन्ही बाजूनी जोरदार घोषणा ठोकल्या.

 ‘न्याय द्या. न्याय द्या. बेकारांना रोजगार द्या.'

 ‘बी.पी.एल. ची यादी रद्द करा. रद्द करा.'

६८ । प्रशासननामा