पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/65

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 होते; त्यात या केंद्रास दोन मोठ्या व एक छोटी मतपेटी द्यावी असे लिहिलेलं आहे, पण प्रत्यक्ष वाटप करताना स्टाफमार्फत तीन छोट्या मतपेट्या दिल्या गेल्या व केंद्राध्यक्ष एक मतपेटी इथंच विसरले म्हणून हा प्रकार झाला. यात शरणसाहेबांची काही चूक नाही व माझी पण नाही आणि असेल तर दोघांचीही आहे. ॲज ए रिटर्निंग ऑफिसर, त्यांची जादा आहे. असे असताना मी दोषी आहे असं त्यांनी म्हणावं हे उचित नाही.'

 चंद्रकांतला वाकोडकरांचं म्हणणं पटलं होतं. मतदान साहित्य घेताना नीट घेणं व तपासणं हे केंद्राध्यक्षाचं काम होतं व झोनल ऑफिसर म्हणून उपअभियंत्याने ते तपासणे, मतदानाच्या दिवशी तीनदा भेट देऊन साहित्य कमी तर पडत नाही ना हे पाहणे त्याचे कर्तव्य होते. त्या दोघांनी आपल्या विहित कार्यात कसूर केल्यामुळे त्यांना निलंबित केले होते. आता वरच्या स्तरावर कारवाईची गरज नव्हती.

 पण निवडणूक निरीक्षक शर्मा हे वाकोडकरांना दोषी मानत होते. विमल शरणची यात काही कसूर नाही या मताचे होते. चंद्रकांतला हे खटकले. तो अलगदपणे कलेक्टरांना म्हणाला,

 'सर, खरं तर दोघेही प्रत्यक्ष दोषी नाहीत. असतील तर दोघे इक्वली रिस्पॉन्सिबल मानले पाहिजेत. अशावेळी आय. ए. एस. म्हणून विमलला वाचवायचा शर्मासाहेबांचा प्रयत्न उचित नाही. वाकोडकरांना तुम्ही जाणता. एक नेक, कर्तव्यदक्ष तहसीलदार आहेत. आपण पुन्हा एकदा शर्मासाहेबांशी बोलावं आणि कार्यवाही टाळावी. केंद्राध्यक्ष व उपअभियंत्याला निलंबित केलं आहे ते पुरेसे आहे.'

 कलेक्टर शर्माशी बोलले की नाही हे नंतर चंद्रकांतने त्यांना विचारले नाही. कारण तेही शर्माप्रमाणे थेट आय. ए. एस. असल्यामुळे विमलचा काही दोष नाही असं मानत होते. त्यामुळे चंद्रकांत काय समजायचे ते समजून चुकला होता. आणि त्याचा अंदाज खरा ठरला. त्याचा प्रत्यय अवघ्या महिनाभरातच आला. निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे वाकोडकरांविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचा आदेश विभागीय आयुक्ताकडून आला होता.

 विमल शरण सहीसलामत सुटला होता.

 आता वाकोडकरांविरुद्धच्या विभागीय चौकशीचा अहवाल चंद्रकांतपुढे होती. चौकशी अधिकाऱ्यांनीही वाकोडकरांना दोषी मानून त्यांची पेन्शन पन्नास रुपयांनी कमी करावी, अशी शिफारस केली होती.

 चंद्रकांतने अभ्यासपूर्ण टिपणी लिहून वाकोडकर या प्रकरणात दोषी नाहीत

६४ । प्रशासननामा