पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ‘सर,' चंद्रकांतनं ऊर्जा सचिवाकडे पहात कलेक्टरांना म्हणलं. 'इथे प्रत्येक गोष्ट स्वत: पाहावी लागते. निवडणुकीत क्षमा नसते आणि आता शेषनसाहेबांच्या राज्यात तर नाहीच नाही.' त्याचा हा सूचक इशारा विमलच्या ‘आय. ए. एस. च्या तोऱ्यात वावरणाऱ्या व खालच्यांनी सारं करावं, मी फक्त सुपरवाईज करीन' या वृत्तीचा होता. निवडणूक कामाची प्रक्रिया दीर्घ व किचकट असते. विमल बेफिकीर असे. कंटाळा करी. चंद्रकांतने कलेक्टरांनाही याबाबत पूर्वी पण सावध केले होते. पण आज घडलेला प्रकार पहाता कलेक्टरनी विमलला सूचना दिल्याचे दिसत नव्हते. मध्यरात्री कलेक्टर व निवडणूक निरीक्षक शर्मा परतले. त्यांनी चंद्रकांतला पुन्हा बोलावून झालेला प्रकार सांगितला.

 त्या मतदान बंद पडलेल्या गावी, मतदारांच्या संख्येनुसार दोन मोठ्या मतपेट्या व एक छोटी मतपेटी लागणार होती; परंतु गफलतीने तेथे तीन छोट्या मतपेट्याच दिल्या गेल्या. त्यातही त्या केंद्राचा मतदान केंद्राध्यक्ष एक मतपेटी तहसील कार्यालयातच विसरून गेला. दुपारी बारापर्यंत दोन्ही छोट्या मतपेट्या तीस टक्के मतदानातच भरून गेल्या. हे गाव आडवळणाचं व नदीपलीकडे होते आणि सुमारे अर्धा किलोमीटर पायी जावं लागत होते. त्यामुळे झोनल ऑफिसरने पुन्हा तिथे जाण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे केंद्राध्यक्षाला मतदान स्थगित करण्याखेरीज पर्याय नव्हता. एखादा माणूस तालुक्याला पाठवून निरोप देणेही शक्य नव्हते, कारण जवळच्या गावाहून एस. टी. ने जाणे हा एक द्राविडी प्राणायाम होता...

 कलेक्टरांनी मतदान साहित्य नीट तपासून न घेतल्याबद्दल केंद्राध्यक्ष आणि तीनवेळा प्रत्येक मतदान केंद्रास भेट देण्याच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल उपअभियंत्यास रात्रीतून तडकाफडकी निलंबित केले.

 दुसऱ्या दिवशी दुपारी निवडणूक निरीक्षकांच्या सूचनेप्रमाणे चंद्रकांतने फोन करून विमल शरण व वाकोडकर यांना बोलावून घेतले. विमल शरणनं सफाई देताना सारा दोष वाकोडकरांवर ढकलीत म्हटलं,

 ‘वाकोडकरांना मी सूचना दिल्या होत्या. त्यांनी स्वतः एक एक मतदान केद्रासाठी मतपेट्या व इतर साहित्य द्यावं असं सांगितलं होतं. त्यांनी ते स्वत: न करता खालच्यांना वाटप करायला सांगितलं. म्हणून हा प्रकार घडला.'

 वाकोडकरांनी हिंमत धरून परखडपणे सांगितले.

 'कुठेच तहसीलदार - साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वतः मतदान साहित्याचे वाटप करीत नसतो. पुन्हा मला शरणसाहेबांनी स्वत: वाटप करावं, अशा सूचना दिल्या नव्हत्या. मतदान साहित्य वाटप रजिस्टर मी स्वत: तपासले

प्रशासननामा । ६३