पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 चंद्रकांतसाठी धक्कादायक मुळीच नव्हतं; पण आज त्याची केस होती, तो आरोपी होता, आणि चुकीच्या पद्धतीनं केस ॲडमिट करून घेतल्यामुळे त्याच्या लौकिकावर उगाच आघात होत होता.

 चंद्रकांत उत्तरादाखल एवढेच म्हणाला, 'यामुळे एक धडा मी नक्कीच शिकलो आहे. आपण माणसालाच काय देवालाही मदत करू नये. तोही आपला वाली नसतो.'

 फौजदारी वकील म्हणून मराठवाड्यात दबदबा असलेले त्याचे वकील वसंतराव त्याची पाठ थोपटीत म्हणाले,

 ‘तुम्ही काही काळजी करू नका. आपण नक्की जिंकणार आहोत.'

 चंद्रकांत स्वत: पदसिद्ध महसूल न्यायाधीश होता. या केसमध्ये काही तथ्य नाही, हे त्याला माहीत होतं. पण न्यायमूर्ती म्हणून जे जज्ज समोर होते, त्यांचा भरवसा वाटत नव्हता. कारण त्यांच्या भ्रष्टाचाराची व खुन्नसची चर्चा आम होती. संधी मिळाली की, ते तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी आदी महसूल अधिकाऱ्यांना कोर्टात हजर राहण्याची सक्ती करत असत. कलेक्टरांनाही दोनदा कोर्टात साक्षीसाठी यावं लागलं होतं. आणि एका भूसंपादन प्रकरणात त्यांची कार जप्त करण्याचा आदेश दिला होता, मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी त्यात लक्ष घालून त्याला स्थगिती दिली होती.

 होनरावनं त्याला आरोपी बनवून वॉरंट बजावून आज हजर राहायला भाग पाडलं होतं, त्यामुळे चिंता वाटत होती. कोणतीही चूक नसताना आरोपीच्या बाकावर बसणं त्याला अपमानास्पद वाटत होतं.

 प्रांत अधिकारी म्हणून एका प्रकरणी दिलेल्या निकालावर आयुक्तांकडे रीतसर अपीलाची मुभा असतानाही होनराव व कुलकर्णी वकील या दुकलीनं हा खटला भरला होता. अधिकाराचा गैरवापर करून चंद्रकांतने होनरावच्या नावावरची जमीन आसनगावच्या मारुती देवस्थानच्या नावे लावून टाकली; तीही बदली झाल्यानंतर, जाता जाता घाईघाईने व कायद्याची रीतसर प्रक्रिया न पाळता. होनरावला नोटीस न देता, त्याला अंधारात ठेवून, त्याच्या माघारी देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांशी संगनमत करून, असा आरोप ठेवून होनरावनी वैयक्तिक फौजदारी केस कोर्टात टाकली होती.

 आसनगावचं मारुती मंदिर, पंचक्रोशीत जागृत देवस्थान. दहा वर्षांपूर्वी देवस्थानच्या एका पुजाऱ्यानं जुन्या सातबारा रजिस्टरवर वर्षनिहाय पीक नोंदी करायची जागा संपल्यामुळे पुनर्लेखन करताना तलाठ्याला हाताशी धरले आणि देवस्थानला इनाम असलेल्या जमिनीवरची देवस्थानच्या प्रतिष्ठानची नोंद उडवून

५२ । प्रशासननामा