पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/44

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

महत्त्वाची मिटींग चालू असताना विनापरवानगी, तेही अशा अवस्थेत आलात?'

 खानोलकर आता काहीसे सावरलेले होते. ते आपल्या मूळच्या बेधडक स्वरात म्हणाले,

 “तुम्ही साऱ्या जिल्ह्यातील जनतेच्या रक्षणाची चिंता करीत आहात, त्यासाठी बैठक घेत आहात; पण तुमच्या आदेशाप्रमाणे पाणीटंचाई निवारणार्थ काम करणाच्या माझ्यासारख्या तुमच्या सहकारी अधिकाऱ्यांच्या रक्षणाचं काय ? आज त्याची टाकळीला गाढवावर बसवून धिंड काढली गेली, गळ्यात चपलांच्या माळा घातल्या गेल्या... आणि तोंडाला काळे फासलं गेलं.. हा खानोलकर कामात कधीच चुकला नाही. टाकळीच्या संदर्भातही नाही.. तरी... तरी...'

 पुन्हा त्यांचा आवाज भरून आला. आपले वाक्य त्यांना पूर्ण करता आले नाही. प्रसंगाचे गांभीर्य सर्वांना जाणवले.

 कलेक्टर आणि एस. पी. चांगलेच अस्वस्थ झाले. चंद्रकांत उठत म्हणाला,

 ‘एक्सक्यूज मी सर, मी खानोलकरांना अँटी-चेंबरमध्ये नेतो. त्यांची केस समजून घेतो. नंतर तुम्हाला व एस. पी. साहेबांना ब्रीफ करतो.'

 चंद्रकांत खानोलकरांना अँटी-चेंबरमध्ये घेऊन गेला.

 ‘शांत व्हा खानोलकर. कालची आपली चर्चा मला माहीत आहे. तुम्ही टकाळीला सर्वेक्षणाला गेला होतात ना? तिथं काय झालं?'

 चंद्रकांतच्या आपुलकीच्या स्वरांनी खानोलकरांचा इतका वेळ आवरून ठेवलेला प्रक्षोभ आणि भावनांचा बांध फुटला. मानी व बेडर म्हणून प्रतिमा असलेला, पन्नाशीच्या घरातला वरिष्ठ भूवैज्ञानिक ढसाढसा रडू लागला. त्यांचा शर्ट चिखलात माखला आहे, हे दिसत असूनही चंद्रकांत पाठीवरून हात फिरवीत राहिला.

 कालची चर्चा चंद्रकांतला आठवत होती. कलेक्टरांच्या दालनात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, खानोलकर व इतर अभियंते यांच्या बैठकीत पाणी टंचाईची व्याप्ती व उपाययोजना यांचा आढावा घेण्यात येत होता. त्याचवेळी शिपायानं टाकळीच्या सरपंचांची चिठ्ठी आणून दिली. पाणीटंचाईच्या संदर्भात कलेक्टरांना त्यांना भेटायचे होते. हे सरपंच जि. प. अध्यक्ष तसेच पालकमंत्री यांच्या निकटच्या वर्तुळातले होते.

 टाकळी हे पाणीटंचाईच्या संदर्भात कठीण गाव होते. टँकर, बोअरवेल, तात्पुरती नळ योजना याद्वारे नागरिकांना पेयजल दिले जात होते. यंदा आतापर्यंत तरी पाण्याचा साठा समाधानकारक होता. पण ज्याअर्थी सरपंच भेट मागत होते त्याअर्थी तिथे पाणी कमी झाले असणार व पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरू

प्रशासननामा । ४३