पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/43

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



जेव्हा पाणी पेटवले जाते...



 ‘हा काय तमाशा आहे, मि. खानोलकर?'

 जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, तालुका दंडाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक कलेक्टर संतोष सिंग घेत होते. डॉ. आंबेडकर जयंती आणि शिवजयंती या निमित्त कायदा व सुव्यवस्था यांच्या संदर्भात ती बैठक होती. जिल्हा पोलीस अधीक्षकदेखील हजर होते. बैठकीची जबाबदारी अप्पर जिल्हादंडाधिकारी म्हणून चंद्रकांत यांची होती. बैठक अकरा वाजताच सुरू झाली होती. साडेबाराच्या सुमाराला मिटींग हॉलमध्ये धाडकन दार उघडीत कोणीतरी आले. सारं अंग चिखल-मातीने भरलेले व तोंडाला काळे फासलेले. ते जिल्ह्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. खानोलकर होते. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (जी. एस. डी. ए.) यांचे काम पाहणारे. ते म्हणाले, 'सर..' आणि त्यांना पुढे बोलवेना. त्यांच्या कंठात स्वर रुतल्यासारखा वाटत होता.

 खानोलकरांना चंद्रकांत चांगलाच ओळखत होता. नव्हे, गेल्या दीड वर्षात त्यांचे चांगले स्नेहाचे संबंध प्रस्थापित होत होते. उत्तम भूगर्भशास्त्रज्ञ व सचोटीचे प्रशासक म्हणून ते त्याला आदरणीय वाटत. गतवर्षीच्या दुष्काळात त्यांनी आपला जी. एस. डी. ए. ची यंत्रणा योग्यप्रकारे हाताळून पाणीटंचाईच्या संदर्भात कूपनलिका, विद्युतपंप आणि पाण्याच्या विहिरी यासाठी भूशास्त्रीय सर्वेक्षण मनापासून केले होते. त्यांना जिल्ह्याची सर्व माहिती, आकडेवारी मुखोद्गत होती. तालुकानिहाय व गावनिहाय जलस्रोतांची यादी जवळच्या वहीत असायची. ते रोखठोक बोलायचे. ज्ञान, माहिती आणि काम चोख. कुणी पदाधिकारी पाणीटंचाईच्या निमित्ताने त्यांना कधी खिंडीत गाठू शकला नव्हता की, अडचणीत आणू शकला नव्हता;

 खानोलकर नेहमी टापटीप आणि फॉर्मल पोशाखात असत. आज त्याच कपडे चिखलघाणीत माखलेले होते. चेहऱ्यावर काळे फासलं गेलं होतं. तशा अवस्थेतच ते कलेक्टरांच्या मिटींगमध्ये आले होते. त्यामुळे नाराज झालेल्या कलेक्टरांनी किंचित आवाज चढवून विचारले, 'व्हॉट इज धीस खानोलकर ?

४२ । प्रशासननामा