पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यावरच तुटून पडतात व खळबळ उडवून देतात. भाबडा मध्यमवर्ग त्यांना डोक्यावर घेतो. त्यांचा नैतिक अहंकार एवढा प्रचंड असतो की, कावीळ झालेल्या रुग्णाला सर्व जग पिवळे दिसते, तसे त्यांना इतर सर्वजण भ्रष्ट वाटू लागतात. सगळ्या विकास कामांची त्यामुळे वाट लागते. काही अधिकारी हे स्थितिवादी असतात. तर काहींना केवळ पदाची सत्ता व मानमरातब भोगायचा असतो. त्यामुळे बदलीनंतर धोरणात आणि कामाच्या अग्रक्रमात सातत्य टिकून राहत नाही. असं साक्षरता अभियानाचं होऊ नये ही माझी इच्छा. त्यासाठी तर मी जरूर प्रयत्नशील राहीन, पण संतोखसिंग काय, जाधव काय, यांची कमतरता जाणवल्यावाचून राहणार नाही. म्हणूनच मला अभियान संपण्यापूर्वी धावबाद झालेलं चालणार नाही.'

 सभेमध्ये सर्वांना क्रिकेटच्या भाषेत बोललेलं आवडलं होतं. त्यातून चंद्रकांत जे सूचित करीत होता, त्याचा मथितार्थ केवळ रशीद व जाधवच्या लक्षात आला होता.

 कारण चंद्रकांतच्या पण अकस्मान बदलीचीही शक्यता होती. राज्याचे पुरवठामंत्री त्या जिल्ह्याचे होते रहिवासी, तर शेजारच्या जिल्ह्याचे पालकमंत्री. चंद्रकांत हा अप्पर जिल्हाधिकारी असल्याने रेशन दुकाने, केरोसिन, पेट्रोल व गॅस वितरण आदी कामाच्या संदर्भात पुरवठा मंत्र्यांशी त्याचा नित्य संबंध यायचा. त्यानं घातलेल्या धाडी आणि जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत दिलेले निर्भीड निवाडे यामुळे त्याची प्रतिमा उंचावली होती. त्याच्या कारभाराचा तडाखा बसलेल्यांमध्ये पुरवठामंत्र्यांचे काही नातेवाईक व कार्यकर्तेही होते. सांगूनही तो त्यांचं ऐकत नसल्यामुळे मंत्र्यांचा रोष होताच. शिवाय चंद्रकांतच्या श्रेणीचा एक अधिकारी या जिल्ह्यात येण्यास उत्सुक होता. तो पुरवठामंत्र्यांच्या जातीचा व नात्यातला होता. त्यामुळे चंद्रकांतची बदली होण्याचा दाट संभव होता. त्याची विकेट केव्हाही पडू शकत होती. त्यानं कितीही उत्तम खेळ केला तरी आऊट करणाच्या अंपायरकडे प्रशासनरूपी खेळाची नीतिशास्त्र व नियमपुस्तिका कुठे होती? अंपायरनं बोट वर केलं की त्याला चालतं व्हाव लागणार होतं. क्रिकेटमध्ये निदान खेळाडू अंपायरशी वाद घालतो व बॅट आपटात रोष प्रकट करतो, तेवढेही स्वातंत्र्य अधिकाऱ्यांना नसते.

 चंद्रकांतला या सर्व खेळाची चांगली कल्पना होती. पण तो काही करू शकत नव्हता. मुख्य म्हणजे राजकीय कारणास्तव मुदतपूर्व बदल्यांची त्याला सवय झाली होती. त्याला त्याचे विशेष दु:खही नव्हतं. खंत एकच राहून राहून वाटायची, आपली जर या आठ-पंधरा दिवसात बदली झाली तर साक्षरता

३८ । प्रशासननामा