पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



एका सेक्युलर रोडची अजीब दास्तान!



 मराठवाड्यातील एक दुर्लक्षित तालुका. एकेकाळचं मराठवाड्याचं अंदमान. जिल्हा विभाजनानंतर अचानक त्या तालुक्याचं नशीब फळफळलं. इतर दोन मोठ्या तालुक्यांपैकी प्रांत ऑफिस कुठे करावे हे राजकीय स्पर्धेमुळे ठरवणे कठीण झाले. दोन्ही तालुक्यातील मातब्बर पुढाऱ्यांची इच्छा की, काही झालं तरी दुसऱ्या तालुक्याला प्रांत ऑफिस मिळू नये, त्यामुळे या तालुक्याला ते मध्यवर्ती असल्याकारणाने न मागताही प्रांत कार्यालय मिळाले. त्यापाठोपाठ उपपोलीस अधीक्षक व इतरही उपजिल्हा कार्यालये क्रमाने आली आणि तालुक्याच्या विकासाचा मार्ग प्रशस्त झाला.

 चंद्रकांत हा तिथला खऱ्या अर्थानं पहिला प्रांतअधिकारी. तो येण्यापूर्वी चार-सहा महिने दुसऱ्या एका उपजिल्हाधिकाऱ्यांकडे त्याचा अतिरिक्त कार्यभार होता. चंद्रकांतचे हे पहिलेच पोस्टिंग. प्रशिक्षण कालावधीत व्ही. पी. राजा यांच्यासारख्या आदर्श कलेक्टरांच्या हाताखाली त्याने जे आत्मसात केला, ते प्रत्यक्षात उतरविण्याची त्याला इच्छा होती. मंत्री, पुढारी, अधिकाऱ्यांचे दौरे यापासून बराचसा मुक्त असलेला हा प्रांत-विभाग त्याला कामासाठी अत्यंत अनुकूल होता. जलद विकासाच्या उद्देशाने जिल्हा विभाजन व प्रांत कार्यालय निर्मिती झाली, त्याच्या पूर्ततेसाठी तिन्ही तालुके हिंडून, लोकनेते व नागरिकांना भेटून आपल्या तीन वर्षाच्या कालावधीत काय करता येईल हे चंद्रकांतने ठरवलं. अंमलबजावणीसाठी अॅक्शन प्लॅन करून धडाक्यात तो राबवायला सुरुवात केली.

 तालुका मुख्यालयाच्या गावी नगरपालिका असली तरी ते पंधरा-वीस हजार लोकवस्तीचं मोठं खेडंच होतं. पेठ व कसबा अशा दोन भागात त्याचा विभागणी झालेली, मध्ये छोटी नदी. तिच्यावर एक छोटा फरशी पूल होता, पण तसे हे दोन भाग अलग पडलेले होते. दोन्ही भागात मातीचे - क्वचित कुठे गिट्टीचे रस्ते होते. सोलापूर-औरंगाबाद राजरस्त्याला जोडणारा एकमेव डांबरी

२८ । प्रशासननामा