पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 मनमानी वृत्ती यातून व्यक्त होते. 'आरक्षण नसताना रेल्वेत जागा बळकावण्याचे आमदारांचे प्रयत्न', यासारख्या वाचनात येणाच्या बातम्या किंवा अधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये वा मंत्रालयात घुसून लोकप्रतिनिधींनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना केलेली मारहाण, हे प्रकार या वृत्तीचे द्योतक आहेत.

 दुसरा पैलू अधिकाऱ्यांच्या भीरू वर्तनाबाबतचा आहे. तो अधिक चिंतनीय आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी ही राज्य प्रशासनाची दोन चाके आहेत हे विसरून, आता अधिकारी आपण टांग्याचे घोडे आहोत व लोकप्रतिनिधी चाबूक फटकारणारे टांगेवाले आहेत, अशी समजूत करून घेत वागत आहेत. बदलीचा अमोघ आसूड टांगेवाल्या चालकांनी उगारला की, घोडेरूपी अधिकारी शेपूट हलवीत मालकाच्या इच्छेप्रमाणे पळतात. या प्रसंगातल्या अभियंत्यानं बदलीच्या कारवाईच्या भीतीनं चक्क मारहाण करणाऱ्या गुत्तेदारास ओळखण्यास इन्कार केला व भीरुत्व दाखवलं!

 ही भीरुता अधिकाऱ्यांमध्ये का वाढत चालली आहे? या प्रश्नाच्या उत्तरात प्रशासनाचा तिसरा रुजलेला पैलू दिसून येतो. तो आहे, अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा. हा अभियंता कमालीचा भ्रष्ट होता व इथं बदली करून घेण्यासाठी त्यानं बरीच खटपट केली होती. कारण ही पोस्टींग म्हणजे सोन्याची खाण होती. मुंबईत नाही का, काही विशिष्ट पोलीस ठाण्यासाठी सारे पोलिसवाले तुटून पडतात? तशीच ही बाब होती. शासनाच्या प्रत्येक खात्यात काही पदे, काही ठिकाणं ही ‘ओली' असतात, तर काही ‘सुकी.' हा जिल्हा पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांसाठी ‘ओला' जिल्हा म्हणून प्रसिद्ध होता.

 परंतु अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार हा चटकन डोळ्यात भरणारा असतो. कारण त्यांचे सहकारी व हाताखालचे त्याबाबत प्रसिद्धी करतात, लोकप्रतिनिधींना माहिती पुरवतात. त्यामुळे कितीही बेडरपणाचा आव आणला तरी हे भ्रष्ट अधिकारी मनोमन अस्वस्थ असतात, धास्तावलेले असतात. ते लोकप्रतिनिधींना तत्त्वाने, कायद्याने ठामपणे विरोध करू शकत नाहीत. त्यामुळे ते वाकायला सांगितलं, तर रांगायला तयार होतात. भ्रष्टाचार व बदलीची भीती यामुळे बहुसंख्य अधिकारी ताठ मानेने काम करू शकत नाहीत.

 चंद्रकांतसारखे सरळमार्गी, प्रामाणिक व बदलीला न भिणारे अधिकारी प्रशासनात जरूर आहेत; पण मोजकेच, हाताच्या बोटावर मोजता येईल इतपत. प्रसारभारतीचे माजी अध्यक्ष व नावाजलेले सनदी अधिकारी गिल यांनी ‘अॅन अनॉटॉमी ऑफ करप्शन' या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकात असं निरीक्षण नोंदवलं आहे की, १९७0 नंतर अधिका-यांची भ्रष्टता वाढत चालली आहे. आज ती

२६ । प्रशासननामा