पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खाण. ती त्याला गमवावी असं वाटत नाही, हे आता या घटनेनं स्पष्ट झालं आहे.'

 ‘सर, तुम्ही प्रामाणिक आहात व तुम्हाला अन्यायाची चीड आहे; पण त्या संधिसाधू अभियंत्यासाठी तुम्ही आपली खुर्ची पणाला लावावी ?- ही अस्थानी वाया जाणारी तत्त्वनिष्ठा नाही का?'

 ‘नाही मित्रांनो, मी नांदेडच्या नरहर कुरुंदकरांच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्यांचं एक वाक्य मला नेहमी मार्गदर्शन करतं. तत्त्वाशी पक्कं असावं, मग तपशीलात थोडीबहुत तडजोड चालेल. मीही एका मर्यादेपर्यंत तडजोड करू शकतो; पण एखाद्या अधिकाऱ्याला मारहाण होते व चक्क त्याचे आमदार समर्थन करतात, जाहीरपणे. होय! मीच त्याला ठोकून काढायला सांगितले आहे.'असे बेधडकपणे सांगतात, तेव्हा अप्पर जिल्हा दंडाधिकारी म्हणून माझं कर्तव्य मला ती कृती करायला भाग पाडून गेलं. मी फक्त कर्तव्य केलं; पण तेही या पुरोगामी राज्यात सत्तारूढ आमदाराला सहन होत नाही. तेव्हा माझा नाईलाज आहे.'

 ‘तुम्ही आम्हा पत्रकारांना इथं हवे आहात. थोडी तडजोड नाही का करू शकणार?' एकानं विचारलं, तसा चंद्रकांत म्हणाला,

 ‘ती वेळ आता गेलेली आहे. पुन्हा काल आमदारांनी ज्या पद्धतीने मला धमकावयाचा प्रयत्न केला, तो पाहता मला तडजोड शक्य नाही. मी बदलीला तयार आहे.'

 पण चंद्रकांतचं सुदैव असं की, त्याला ओळखणारा व त्याच्यासोबत औरंगाबादला काम करणारा एक उपजिल्हाधिकारी महसूल मंत्र्याचा स्वीय सचिव होता. त्यानं चंद्रकांतला फोन करून माहिती घेतली व मंत्र्यांना घडलेली खरी हकिकत व चंद्रकांतच्या तत्त्वनिष्ठेबद्दल सांगितलं. ते मंत्रीही उमदे होते. त्यांनी आमदारालाच खडसावलं व चंद्रकांतची होऊ घातलेली बदली टळली.

 वाचकहो, काही तपशील वगळले तर वरील घटना सत्य घटना आहे. आमचं प्रशासन काय करीत आहे, यावर एक झगमगता प्रकाशझोत टाकणारा हा प्रसंग आहे.

 यातून प्रशासनाचं जे रूप दिसतं, त्याचे तीन पैलू दिसून येतात.

 एक म्हणजे सत्तारूढ पक्षाच्या आमदाराचं वर्तन. याप्रसंगी त्या आमदाराचं वागणं बालिश व आपण सत्ताधारी पक्षाचे म्हणून आपण म्हणू तसं अधिकाऱ्यांनी वागलं पाहिजे, या अंहकारातून आलेलं होतं. कायदा हा आपल्यासाठी नसतो आणि असेल तर तो मोडण्यासाठी असतो, ही बळावत जाणारी बेछूट व

प्रशासननामा । २५