पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नसतं. बदलाची वा परिवर्तनाची जबाबदारी आपली नाही असा त्यांचा दृष्टिकोन असतो. अशांना हे पुस्तक भाबडे, अतिरंजित व कदाचित कपोलकल्पित वाटेल. पण हे अनुभव व प्रसंग लेखनातली वाचनीयता जपावी म्हणून केलेली पाच/दहा टक्क्यांची कारागिरी वगळता सत्य आहेत, हे नम्रपणे मी सांगतो. हे वाचून कदाचित त्यांचा सिनिसिझम अंशमात्र जरी कमी झाला तरी लेखनाचं सार्थक झालं असं म्हणता येईल.

 या उलट आशावादी, भारावलेलं व परिवर्तनावर श्रद्धा असणारं मन व विचार घेऊन जगणं आव्हानकारक असतं. ते प्रवाहाविरुद्ध दमछाक करीत पोहणं असतं. पण त्यातला आनंद आणि होणारं व अनुभवास येणारं परिवर्तन जीवन-सार्थकता प्रदान करणारं असतं. प्रशासन हे जीवनाचं एक अंग आहे, त्याबाबत काही प्रमाणात का होईना, आशावाद निर्माण व्हावा आणि नागरिकांनी आपलं बळ अशा मिशनरी वृत्तीच्या अधिका-यांच्या मागे उभं करावं ही पण या लेखनामागची एक प्रेरणा आहे.

 हे पुस्तक अत्यंत देखण्या स्वरूपात आणल्याबद्दल श्री. अरविंद पाटकर व श्री. आशिश पाटकर यांचे आभार मानणे औपचारिकपणाचे होईल. या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांच्याशी जो मैत्रभाव सहज संवादी स्वरूपात जुळून आला आहे त्या मित्रऋणातच कायम राहाणं मला अधिक आवडेल.

 रसिक मराठी वाचक या पुस्तकाचं स्वागत करतील ही अपेक्षा.

लक्ष्मीकांत देशमुख

श्रीनिवास गार्डन, बी-२, सुमित्रा सदनसमोर,

केदारनाथ मंदिराजवळ, मॉडेल कॉलनी,

शिवाजीनगर, पुणे - ४११०१६

संपर्क : ९३२५२९७५०९

९८२३५३३१२८

ईमेल : laxmikant05@yahoo.co.in

एकोणीस