पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

केवळ टूम म्हणून खचितच आलेला नाही. तरीही काही एक नवा प्रयोग मला या लेखनात मला जे सांगायचं, मांडायचं होतं त्यासाठी करता आला, किंबहुना तसा प्रयत्न तरी केला हे समाधान आहे. एक लेखक म्हणून हा फॉर्म आणि कथा-लेखाचे रूप माझ्यातल्या प्रयोगशील लेखकाचे जागरूक रूप आहे, असं मला नम्रपणे म्हणावसं वाटतं !

 थोडासा आत्मस्तुतीचा दोष पत्करूनही व भाबडेपणाचा आरोप सहन करूनही मला म्हणावसं वाटतं की, या पुस्तकातून झपाट्यानं कमी होत चाललेल्या चांगल्या कार्यक्षम प्रशासनाची विविध रूपं रेखाटली आहेत. माझी स्वत:ची प्रशासक म्हणून काम करण्याची मिशनरी वृत्तीची, सकारात्मक व सेवेसाठी सत्ता राबवायची आणि कल्पक प्रशासनाची भूमिका मी सेवेतील पहिल्या दिवसापासून जगायचा प्रयत्न केला आहे. आणि माझा विश्वास आहे, आमच्या जातकुळीचे अधिकारी काही अल्पसंख्य नाहीत, फक्त ते समाजासमोर येत नाहीत. त्यामुळे नागरिकांना त्यांची जाणीव नसते. पण त्यामुळे फारसे काही बिघडत नाही. चांगले काम लोकांसमोर बातमी वा माहितीच्या रूपाने आले नाही म्हणून ते काम कमी होत नाही. त्या कामाने समाजात अंशमात्राने का होईना, सकारात्मक बदल होत असतो व तो मुंगीच्या गतीने का होईना, चार पावले पुढे टाकत असतो. हा बदल वर्तमानात आज कदाचित जाणवणार नाही, पण गीतेत सांगितल्याप्रमाणे कर्मयोगी असणारे व झपाटल्याप्रमाणे काम करणारे अनेक झपाटलेले अधिकारी व कर्मचारी मी पाहिले आहेत, म्हणून प्रशासनाचा मला कंटाळा येत नाही, की मी कधी त्याबाबत सिनिक बनत नाही. अर्धवट भरलेला पेला पाहून सिनिक व निराशावादी तो किती रिकामा आहे हे सांगतील. पण डॉ. रघुनाथ माशेलकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर माझ्यासारखे ‘धोकादायक आशावादी' (Dangerous optimist) तो किती भरला आहे सांगतील. किंबहुना, तो पूर्णपणे निश्चितच रिकामा नाही हे पटवून द्यायचा तरी प्रयत्न करतील.

 सिनिक वा निराशावादी होणं फार सोपं असतं. कारण त्यासाठी फारसं काही करावं लागत नाही. दुर्योधनाची पीतदृष्टी वा छिद्रान्वेषी काकवृत्ती असली, की काम भागतं. पुन्हा त्यांना काही करायचं

अठरा