पान:प्रशासननामा (Prashasannama).pdf/184

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पात्रतेपेक्षा राजकीय संबंधावरून होत असतात. त्यामुळे त्यांचं डोळ्यावर कातडे ओढून घेणं समजून येतं. जमीनदारांच्या नामांकित वकिलांनी त्या शहरातील इतर प्रकरणातील निकालांचा संदर्भ देताच उच्च न्यायालयानं खालच्या कोर्टाचा निकाल कायम केला. त्यासाठी सरकारी वकीलांनी माझ्या निरीक्षणाचा व धडधडीत चुकीच्या स्थळ पाहणीचा संदर्भ देत काहीही भाष्य केलं नाही हे उल्लेखनीय आहे. त्यामुळे अपीलाची छोटी चकमक मी जिंकलो. पण भ्रष्टाचारी मार्गानं अंतिम लढाईमध्ये मात्र ते विजयी झाले."

 इनसायडरला ऐकताना एकामागून एक धक्के बसत होते. न्यायसंस्थेबद्दल सर्वसामान्य नागरिकांना असते तेवढीच माहिती त्यालाही होती. मात्र त्यातली विदारकता आणि किडलेपणाच्या व्यापकतेनं तो हादरून गेला होता. राहून राहून त्याला माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या व्याख्यानातलं एक वाक्य आठवत होतं, हे कायद्याचे राज्य नाही, तर काय द्यायचं राज्य आहे.'

 "मित्रा, मला खरंच कळत नाही, आय.ए.एस.दर्जाचे, राज्य सेवेतले, क्लास वन अधिकारी, न्यायमूर्ती आणि उच्चपदस्थ सेना अधिकारी भ्रष्टाचार का करतात? त्यांचे वेतन, मिळणाऱ्या सुविधा आणि मानसन्मान उत्तम रीतीनं जगण्यासाठी मोअर दॅन सफिशिअंट असताना, का मोह होतो या वाममार्गाचा? त्याचं उच्चशिक्षण त्यांना विवेकी व विचारी न बनवता, विकारी व मोहवश का बनवतं ? कितीही विचार केला तरी मला या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर सापडत नाही."

 “मलाही त्याचं एकच ठोस उत्तर कदाचित देता येणार नाही. पण वाढता चंगळवाद आणि व्यापारीकरण हे एक कारण जरूर आहे. तसंच सार्वजनिक मानाच्या क्षेत्रातून आणि मतांच्या राजकारणामुळे झालेल्या पिछेहाटीतून, एक प्रकारची आत्मकेंद्री बनलेली नोकरपेशातील मध्यमवर्गीयांची मानसिकता आणि त्यामुळे पोकळी भरून काढण्यासाठी भोगाची भूल हे दुसरं एक कारण त्यामागे असावं."

 “त्यावर मात करायची असेल तर विवेकाची सुरी धारदार बनवली पाहिजे. जी वाममार्गावर जाताना मला टोचणी देत घायाळ करू शकेल." चंद्रकांत म्हणाला, “हे काम कुणी करावं हा पुन्हा प्रश्नच आहे. अशावेळी एकच हाती उरतं. आपण आपल्यापुरतं विकारी न होता विवेकी राहावं, वागावं..."

 इनसायडरनं चंद्रकांतचा हात स्नेहभरानं घट्ट दाबीत त्याला मूक संमती दिली.

प्रशासननामा । १८३